आसाम रायफल्सच्या जवानाकडून ६ साथीदारांवर गोळीबार, स्वतःवरही झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:53 PM2024-01-24T12:53:37+5:302024-01-24T12:54:44+5:30
दक्षिण मणिपूरमधील एआर बटालियन परिसरात ही घटना घडली.
मणिपूरमध्ये बुधवारी आसाम रायफल्सच्या (एआर) जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना घडली. याबाबत मणिपूर पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमी जवानांना चुराचांदपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, दक्षिण मणिपूरमधील एआर बटालियन परिसरात ही घटना घडली.
मणिपूर पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमींना चुराचांदपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण मणिपूरमधील आसाम रायफल्स बटालियन परिसरात ही घटना घडली. मृत जवान कुकी समाजाचा होता. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही. तसेच, आसाम रायफल्सच्या आयजीच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितले की, जखमींपैकी कोणीही मणिपूरचा नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
From PRO of IG AR (s):
— Manipur Police (@manipur_police) January 24, 2024
There has been an incident of firing by an Assam Rifles Jawan in an ASSAM RIFLES BATTALION deployed close to the Indo - Myanmar border in South Manipur.
One Assam Rifles Jawan opened fire on his colleagues injuring six of them (all injured are…
रिपोर्टनुसार, गोळीबार करणारा जवान चुराचांदपूरचा रहिवासी होता. तो नुकताच सुट्टी संपवून पुन्ही ड्युटीवर आला होता. त्याची तैनाती भारत-म्यानमार सीमेजवळ दक्षिण मणिपूरमध्ये होती. बुधवारी सकाळी त्याने सहकारी जवानांवर गोळीबार केला. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारामागील हेतू अस्पष्ट असून अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अफवांपासून दूर राहण्याच्या सूचना
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही संभाव्य अफवा दूर करण्यासाठी आणि कोणतीही चर्चा टाळण्यासाठी घटनेची माहिती देणे महत्त्वाचे आहे. या दुर्दैवी घटनेला सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी जोडता कामा नये. जखमींपैकी एकही मणिपूरचा नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आसाम रायफल्सच्या सर्व बटालियनमध्ये सर्व स्तरातील लोक असतात. ज्यामध्ये मणिपूरमधील विविध समुदायातील लोकांचाही समावेश आहे. समाजाचे ध्रुवीकरण असूनही, मणिपूरमध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी सर्व कर्मचारी एकत्र राहत आहेत आणि काम करत आहेत.