आसाम दहावी बोर्ड परीक्षा, आरएसएसच्या शाळेत मुस्लिम मुलगा पहिला
By admin | Published: June 1, 2016 09:00 AM2016-06-01T09:00:37+5:302016-06-01T09:00:37+5:30
आसाममध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत वेटरचा मुलगा पहिला आहे. सरफराझ हुसैन (१६) असे त्याचे नाव असून, तो आरएसएसकडून चालवल्या जाणा-या शाळेत शिक्षण घेत होता.
Next
ऑनलाइन लोकमत
गुवहाटी, दि. ३१ - आसाममध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत वेटरचा मुलगा पहिला आहे. सरफराझ हुसैन (१६) असे त्याचे नाव असून, तो आरएसएसकडून चालवल्या जाणा-या शाळेत शिक्षण घेत होता. सरफराझ संकरदेव शिशू निकेतचा विद्यार्थी आहे. आरएसएसशी संलग्न असणा-या विद्या भारतीकडून ही शाळा चालवली जाते.
सरफराझच्या वडिलांना हलाखीच्या परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागते. सरफराझने ६०० पैकी ५९० गुण म्हणजे ९८.३ टक्के गुण मिळवून संपूर्ण आसाममधून पहिला येण्याचा मान पटकावला. सरफराझ चार लाख मुलांमधून पहिला आला.
माझ्या कष्टाचे चीज झाले. पहिल्या दहामध्ये मी येईन असा मला विश्वास होता. पण पहिला क्रमांक माझ्यासाठी अनपेक्षित सुखद धक्का आहे. माझे शिक्षक, नातेवाईकांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे सरफराझने सांगितले.
सरफराझचे वडिल अझमल हुसैन एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करतात. ते टेकडीवरच्या भागामध्ये रहातात. आज मी माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही असे हुसैन यांनी सांगितले.
निकाल जाहीर होताच राज्याचे शिक्षणमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सरफराझच्या शाळेत धाव घेतली व गुवहाटीच्या कॉटन कॉलेजमधील सरफराझची संपूर्ण फी माफ केल्याची घोषणा केली. सरफराझ आता या प्रतिष्ठीत कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. त्यांनी सरफराझला पुढील शिक्षणासाठी पाच लाखांची मदतही जाहीर केली. हेमंत सरमा यांनी नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.