'जय श्रीराम' म्हणण्यास नकार दिल्यानं मारहाण; इमामाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 10:48 AM2019-07-15T10:48:42+5:302019-07-15T10:50:38+5:30
प्रकरणाला धार्मिक वळण दिलं जात असल्याचा पोलिसांना संशय
बागपत: जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मारहाण झाल्याचा आरोप एका इमामानं केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहता, त्यामध्ये कुठेही 'जय श्रीराम' म्हणण्याची सक्ती झाल्याचं दिसत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. बागपतमधील मेरठ-कर्नाल महामार्गाजवळील सरोरा गावात हा प्रकार घडल्याचा दावा इमामानं केला.
मेरठमधील सरधाना इथल्या मशिदीतील मुलांना शिकवून घरी परतत असताना १० तरुणांनी आपल्याला सरोरा गावाजवळ अडवल्याचं इमाम इम्लाकूर रेहमान अली यांनी पोलिसांनी सांगितलं. अली मुझफ्फरनगरच्या बुधानातील जोला गावचे रहिवासी आहेत. या प्रकरणी दोघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'त्यांनी माझ्या डोक्यावरील टोपी काढली आणि दाढी धरुन जमिनीवर ढकललं. त्यांनी मला वारंवार जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. या रस्त्यानं पुन्हा गेलास तर खबरदार, अशी धमकीदेखील दिली. पुन्हा या भागात यायचं असेल तर दाढी कापून ये, असा इशारादेखील त्या १० जणांनी दिला', असा दावा अली यांनी केला.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून घटनेचा व्हिडीओ पाहिला. त्यात कुठेही इमामाला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'आम्ही इमामानं दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. प्रथमदर्शनी हा संपूर्ण प्रकार जाणूनबुजून घडवण्यात आल्याचं दिसतं. कोणीतरी मुद्दामहून या प्रकरणाला धार्मिक वळण देत असल्याचा संशय वाटतो,' असं पोलीस उपअधीक्षक अनुज कुमार चौधरींनी सांगितलं.