Assembly By Election Results 2023: १ जागा, तब्बल ७७ उमेदवार, अनेकांना मिळाली ३, ५, ६, ७ मतं, अखेर असा लागला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:08 AM2023-03-03T09:08:27+5:302023-03-03T09:10:16+5:30
Assembly By Election Results 2023: तामिळनाडूतील इरोड मतदारसंघातील पोटनिवड़णूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. येथे एका मतदारसंघात तब्बल ७७ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे येथे काय निकाल लागतो. याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती.
काल महाराष्ट्रातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसोबतच देशातील इतर राज्यांतील चार ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसने तीन, तर भाजपाने दोन आणि भाजपाच्या मित्र पक्षाने एक जागा जिंकली. दरम्यान, यामध्ये तामिळनाडूतील इरोड मतदारसंघातील पोटनिवड़णूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. येथे एका मतदारसंघात तब्बल ७७ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे येथे काय निकाल लागतो. याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती.
तामिळनाडूमधील इरोड मतदारसंघात काँग्रेस आणि एआयएडीएमके यांच्यात थेट लढत होती. त्यात काँग्रेसचे उमेदवार ई.व्ही.के.एस. इलनगोवन यांनी एआयएडीएमकेचे उमेदवार के. के. थेन्नारासू यांच्यावर तब्बल ६६ हजार ८७ मतांनी मात केली. इलनगोवन यांना १ लाख ९ हजार ९०६ मतं मिळाली. तर प्रतिस्पर्धी थेन्नारासू यांना ४३ हजार ८१९ मते मिळाली. या मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या इतर उमेदवारांच्या पदरी मात्र निराशा पडली.
तब्बल ७७ उमेदवार रिंगणात असलेल्या या ठिकाणी १४ उमेदवारांना दहा मतंही मिळता आली नाहीत. त्यातील काही जणांना ३, ५, ६, ७, ८, ९ अशी मतं मिळाली. तर तब्बल ४८ उमेदवारांना १०० मतंही मिळवता आली नाहीत. या मतदारसंघात नोटाला ७९७ मतं मिळाली. तर एकूण ७२ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली.
अपक्ष निवडणूक लढवत असलेले एम. प्रभाकरन आणि आर. कुमार यांना सर्वात कमी म्हणजेच केवळ ३ मतं मिळाली. तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या एस. बलराज, ए. रवी आणि आर. राजेंद्रन यांना केवळ ५ मतं मिळाली. पी. गुणशेखरन आणि ए. नूर मोहमद या उमेदवारांना ६ मतं मिळाली. आर. शशिकुमार आणि सी.एम राघवन यांना प्रत्येकी ७ मतं मिळाली. एस.पी. रामकुमार, आर. विजय कुमार आणि जी. पुरुषोत्तमन यांना प्रत्येकी ८ मतं मिळाली. तर एस. चित्रा आणि डॉ. के. पद्मराजन यांना ९ मतं मिळाली. त्यामुळे सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवारांप्रमाणेच सर्वात कमी मतं मिळवणाऱ्या या उमेदवारांच्या कामगिरीचीही चर्चा होत आहे.