UP Assembly Election 2022: मोठा दावा! २० तारखेपर्यंत दरदिवशी १ मंत्री, ३-४ आमदार राजीनामा देणार; भाजपाला झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:06 AM2022-01-14T10:06:54+5:302022-01-14T10:08:12+5:30
उत्तर प्रदेशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपा आमदार, मंत्र्यांनी पक्षाची साथ सोडल्याने पक्ष नेतृत्व चिंतेत आहे.
लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून भाजपामागची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला लागलेली नेत्यांची गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेटचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजपात राजीनामा सत्र सुरुच झालं आहे. मौर्य यांच्यासह आतापर्यंत ३ मंत्री, ७ आमदारांना भाजपाला रामराम ठोकला आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधून राजीनामा देत बाहेर पडलेले धर्म सिंह सैनी यांनी गुरुवारी दावा केला की, येत्या २० जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी १ मंत्री आणि ३-४ आमदार भाजपाचा राजीनामा देतील. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मार्गे ते सगळे चालले आहेत. मागील ५ वर्षाच्या योगी सरकारच्या काळात दलित आणि मागासवर्गीयांचा आवाज दाबला गेला. त्यामुळे जे स्वामी प्रसाद मौर्य सांगतील तेच आम्ही करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपा आमदार, मंत्र्यांनी पक्षाची साथ सोडल्याने पक्ष नेतृत्व चिंतेत आहे. भाजपातील नाराज नेतेमंडळी प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या गळाला लागतील असे संकेत मिळत आहेत. धर्म सिंह सैनी हे गुरुवारी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील राजीनामा देणारे तिसरे मंत्री आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे सैनी यांनी भाजपा नेतृत्वावर अपेक्षाभंग केल्याचा आरोप केला आहे.
३ दिवसांत ३ मंत्री, ७ आमदारांची विकेट
मागील ३ दिवसांत तीन मंत्री, ७ आमदारांनी भाजपा सोडली आहे. ११ जानेवारीला स्वामी प्रसाद मौर्य, आमदार भगवती सागर, रोशनलाल वर्मा, बृजेश प्रजापति, १२ जानेवारीला मंत्री दारा सिंह चौहान, आमदार अवतार सिंह भडाना, १३ जानेवारीला मंत्री धर्म सिंह सैनी, आमदार विनय शाक्य, मुकेश वर्मा आणि बाला अवस्थी यांनी भाजपाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. समाजवादी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनासोबत घेत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केले आहे.