अमित शाह यांचं ठरलंय? तब्बल १०० आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:56 AM2021-10-29T07:56:23+5:302021-10-29T07:57:31+5:30

Uttar Pradesh Assembly election 2022: सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची रणनीती; अमित शाह आज लखनऊमध्ये

up assembly election 2022 amit shah might cancel ticket of 100 bjp mlas | अमित शाह यांचं ठरलंय? तब्बल १०० आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेकांना धक्का

अमित शाह यांचं ठरलंय? तब्बल १०० आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेकांना धक्का

Next

लखनऊ: पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly election 2022) भारतीय जनता पक्ष (BJP) कामाला लागला आहे. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील सत्ता राखण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज लखनऊचा दौरा करणार आहेत. भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ करून ते पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांची संख्या ४ कोटींच्या घरात नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा भाजपचा मानस आहे. याशिवाय तिकीट वाटपाबद्दलही महत्त्वाची चर्चा होऊ शकते. त्यासाठीच अमित शाह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशात ४०३ पैकी तब्बल ३१२ जागा जिंकल्या. मात्र यातल्या काही आमदारांची कामगिरी चांगली झालेली नाही. पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जवळपास १०० जागांवर आमदारांबद्दल नाराजी आहे. त्यामुळे या १०० आमदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. त्यांच्या जागी निवडणुकीत इतरांना संधी मिळू शकते. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना जातीय समीकरणंदेखील लक्षात घेतली जातील. 

अमित शाह यांनी गेल्या काही वर्षांपासूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणात विशेष लक्ष घातलं आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच पक्षाच्या राज्यातील जागा १० वरून थेट ७३ वर गेली. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं तीनशेहून अधिक जागा जिंकल्या. त्यातही शाह यांचा सिंहाचा वाटा होता.

Web Title: up assembly election 2022 amit shah might cancel ticket of 100 bjp mlas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.