UP Assembly Election 2022: वाद, धक्काबुक्की आणि तुंबळ हाणामारी, किरकोळ कारणावरून भर मंचावर भाजपा नेते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 03:44 PM2021-12-30T15:44:34+5:302021-12-30T15:50:38+5:30
UP Assembly Election 2022: कन्नौजमध्ये छिबरामऊ येथे भाजपाची जनविश्वास यात्रा पोहोचली तेव्हा प्रचारसभेदरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंचावर बसण्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कन्नौजमध्ये भाजपाच्या जनविश्वास यात्रेवेळी मंचावर भाजपाचे नेते किरकोळ कारणावरून मंचावर आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छिबरामऊ येथे भाजपाची जनविश्वास यात्रा पोहोचली तेव्हा प्रचारसभेदरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंचावर बसण्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
छिबरामऊच्या नेहरू कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये शहरातून फिरून झाल्यानंतर भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पोहोचली होती. तिथे सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत मोठी गर्दी झाली होती. मंचावर जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. मात्र त्यातून सुरुवातीला वादावादी, नंतर धक्काबुक्की आणि अखेरीस थेट हाणामारीच सुरू झाली. यामध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बिपिन द्विवेदी यांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मंचावर जागा मिळवण्यासाठी भाजपाच्या अनेक नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यामुळे बाचाबाची होऊन प्रकरण आपापसातील हाणामारीपर्यंत पोहोचले. आता या घटनेचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपसात लढताना दिसत आहेत. अखेर ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढून हे प्रकरण शांत केले.