Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:58 AM2022-01-30T11:58:55+5:302022-01-30T11:59:47+5:30

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत.

Assembly Election 2022: Senior leaders don't get Modi's time, don't get clear message! | Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

Assembly Election 2022: ज्येष्ठ नेत्यांना मोदींची वेळ मिळेना, स्पष्ट संदेश कळेना!

Next

-   शरद गुप्ता 

वेळ मिळत नाही
उत्तर प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते मागील चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांच्यावर कृपा झालेली नाही. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या सुमारे ३०० उमेदवारांपैकी केवळ सहाजणांना त्यांच्या शिफारशीने तिकिटे देण्यात आली आहेत. यात ते पंतप्रधानांचा हस्तक्षेप मागत आहेत. परंतु, पंतप्रधान त्यांना भेटीची वेळ न देऊन त्यांना कोणता संदेश देऊ इच्छित आहेत, ही एवढी साधी बाब त्यांच्या लक्षात येत नाही.  

हार-जीतचा मंत्र
उत्तराखंडच्या रानीखेतमधून कोणताही पक्ष निवडणूक जिंकू इच्छित नाही. कारण जो पक्ष येथे जिंकला त्याचे सरकार राज्यात बनू शकलेले नाही. २००२ मध्ये व २०१२ मध्ये येथे भाजप विजयी झाला, तर सरकार काँग्रेसचे स्थापन झाले. तथापि, २००७ व २०१७मध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले तेव्हा भाजपने सरकार बनविले. परंतु, तीन जागा अशा आहेत, जेथे कोणताही पक्ष पराभूत होऊ इच्छित नाही. गंगोत्री, बद्रीनाथ व रामनगर या जागा ज्या पक्षाने जिंकल्या, त्या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले, असा इतिहास आहे.  

आपने दिला धक्का
उत्तराखंडमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष त्रिकोणी बनविण्याचा आम आदमी पार्टीचा पुरेपूर प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप व काँग्रेसला या पक्षाने जबरदस्त धक्का दिला. नैनितालमध्ये अखेरच्या क्षणी भाजप नेते हेम आर्य यांना तिकीट दिले, तर प्रदेश महिला काँग्रेस सचिव राहिलेल्या मंजू तिवारी यांना कालाढूंगी येथून मैदानात उतरविले. दोन्ही जागांवर आधी जाहीर केलेले उमेदवार बदलून तेथे यांना उमेदवारी दिली गेली. या दोहोंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काही मिनिटे आपचे सदस्यत्व स्वीकारले.   

मुख्यमंत्री काय करीत होते? 
पंजाबमध्ये मागील सुमारे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंह निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा जुना पक्ष काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करीत सुटले आहेत. मात्र, यामुळे तेच जास्त उघडे पडत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना वाळू तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी वाळू तस्करांना अभय दिल्याचा आरोप केला. आता काँग्रेसचेच नेते सवाल उपस्थित करीत आहेत की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे हे आरोप खरे असतील तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोणतीच कारवाई का केलेली नाही?   

युवकांवर विश्वास नाही
भाजपने उत्तराखंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजयुमो अध्यक्ष राहिलेले पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. कारण पक्षाला धडाडीचे युवा नेतृत्व पाहिजे होते. परंतु, ७० सदस्यांच्या विधानसभेत आतापर्यंत जाहीर केलेल्या ६९ जागांपैकी एकाही जागेवर पक्षाने युवा मोर्चाच्या नेत्याला तिकीट दिलेले नाही.

Web Title: Assembly Election 2022: Senior leaders don't get Modi's time, don't get clear message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.