UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात शिवसेनेनं फासा टाकला! किसान रक्षा पक्षासोबत आघाडीची चर्चा, बुंदेलखंडमध्ये डरकाळी फोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 06:00 PM2022-01-14T18:00:24+5:302022-01-14T18:01:00+5:30
UP Assembly Election 2022: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून राहिलं आहे.
UP Assembly Election 2022: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून राहिलं आहे. भाजपा आणि समाजवादी पक्षात थेट लढत होत असताना शिवसेनेनंही आता डरकाळी फोडली आहे. झांशी येथे आज शिवसेना आणि किसान रक्षा पक्षाच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठीची चर्चा झाली आहे. किसान रक्षा पक्ष गेल्या २५ वर्षांपासून बुंदेलखंड किसान महापंचायत संघटनेसाठी काम करत आहे.
आघाडीसाठीची प्राथमिक चर्चा यशस्वी झाली असून येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. शिवसेना आणि किसान रक्षा पक्ष बुंदेलखंडातील सर्व १९ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवेल असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी आज शिवसेनेसोबत आहे हे यातून सिद्ध होतं असं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि किसान रक्षा पक्षात झालेल्या बैठकीत किसान रक्षा पक्षाचे अध्यक्ष गौरीशंकर बिदुआ, महासचिव विजयकुमार कर्ण, अनिल कुमार आणि शिवसेनेचे बुंदेलखंड प्रभारी तसंच प्रदेश उपप्रमुख राजेश साहु, शिवसेना किसान प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, संतोष खटीक, ममता कश्यप, मंडल प्रमुख प्रमोद श्रीवास्तव, मनोज शर्मा, फुलचंद विश्वकर्मा आणि ब्रिजेश जोशी उपस्थित होते.