UP Assembly Election : भाजपची गेमचेंजर खेळी? 107 पैकी 60 टक्के OBC-SC उमेदवार उतरवले मैदानात, असं आहे जातीय गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:09 PM2022-01-15T18:09:54+5:302022-01-15T18:10:42+5:30
भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने 107 पैकी 21 नवीन चेहऱ्यांवर डाव लावला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक-2022 साठी आता सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी भाजपने 107 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. त्याच वेळी, या संपूर्ण यादीतील सर्वात खास नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिसले. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिराथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यांपैकी 57 जागांसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठीही 55 पैकी 48 जागांसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने 107 पैकी 21 नवीन चेहऱ्यांवर डाव लावला आहे. तर 63 विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवला आहे.
43 टक्के तिकिटे सामान्य वर्गाला -
तिकीट वाटपात भाजपने प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने 43 टक्के तिकिटे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दिली आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील एका जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. 68 टक्के उमेदवारांमध्ये दलित, अनुसूचित जाती आणि महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. जातीच्या आधारावर याचा विचार करता, 44 जागांवर ओबीसी उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. 19 जागांवर अनुसूचित जाती, तर 10 जागांवर महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.
कुठल्या प्रवर्गातील किती उमेदवार -
सर्वसाधारण गटातही भाजपने 17 जागांवर ठाकूर, 10 जागांवर ब्राह्मण, 8 जागांवर वैश्य, तीन जागांवर पंजाबी, दोन जागांवर त्यागी आणि दोन जागांवर कायस्थ यांना तिकीट दिले आहे. 44 ओबीसी उमेदवारांमध्ये 16 जाट, 7 गुर्जर, 6 लोधी, 5 सैनी, 2 शाक्य, 1 खडगवंशी, 1 मौर्य, 1 कुर्मी, 1 कुशवाह, 1 प्रजापती, 1 यादव आणि 1 निषाद प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या प्रतिनिधीत्वाबद्दल बोलायचे तर 13 उमेदवार जाटव प्रवर्गातील आहेत. 2 वाल्मिकी, 1 बंजारा, 1 धोबी, 1 पासी आणि एक सोनकर वर्गातील आहे.