भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:54 AM2023-12-01T06:54:34+5:302023-12-01T06:55:44+5:30
Exit Polls: पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे.
१० एक्झिट पोलपैकी ७ ने राजस्थानमध्ये भाजप जिंकण्याचा अंदाज वर्तविला आहे. ॲक्सिस-इंडिया टुडेने राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार असल्याचा आणि भाजपची बस चुकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात चुकीच्या रणनीतीची पक्षाला किंमत चुकवावी लागू शकते, असेही यात म्हटले आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सनेही राज्यात काँग्रेस आघाडीला ९४ ते १०४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चाणक्य-न्यूज २४ ने दोन्हीपैकी कोणताही पक्ष जिंकू शकेल, असे म्हटले आहे. इतर सर्व्हेंनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
या फॅक्टरचा काँग्रेसला फटका
ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या २२ समर्थक आमदारांच्या पक्षांतरामुळे सत्ता गमावलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वांत मोठा धक्का बसू शकतो. शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु मतदारांनी हा प्रयत्न अयशस्वी ठरवला आहे. भाजपचा जोरदार विजय झाल्यास काँग्रेसला राज्याच्या नेतृत्वात बदल करण्यास भाग पडू शकते.
तेलंगणात काँग्रेसची लाट?
काँग्रेस छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवून ठेवणार आहे आणि तेलंगणामधील दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसकडून सत्ता हिसकावून घेणार आहे, असा अंदाज जवळपास सर्वच सर्व्हेंनी व्यक्त केला आहे. पक्षाची राज्यात लाट आहे आणि पक्षाला ११९ पैकी ७० जागा मिळू शकतात, असेही अनेकांनी म्हटले आहे; परंतु ॲक्सिस-इंडिया टुडेने एक दिवसासाठी अंदाज थांबवला आहे, कारण काही मतदारसंघांमध्ये रात्री ९ पर्यंत
मतदान सुरू होते.