Assembly Election Result 2022: पंजाबमधील बंपर विजयानंतर केजरीवालांचं मोठं विधान, म्हणाले, दिल्ली, पंजाबनंतर आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:44 PM2022-03-10T15:44:51+5:302022-03-10T15:54:03+5:30
Assembly Election Result 2022: दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
चंदिगड - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच आत आम आदमी पक्षाचं लक्ष्य राष्ट्रीय राजकारण असेल असे स्पष्ट केले. दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंजाबच्या लोकांनी कमाल केली. लव्ह यू पंजाब. आज पंजाबमध्ये जे निकाल लागले आहेत. तो एक मोठा इन्कलाब आहे. आज पंजाबमध्ये मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. बादल, कॅप्टन, चन्नी, सिद्धू असे दिग्गज पराभूत झाले आहेत. ही मोठी क्रांती आहे. आज जे कुणी माझं भाषण ऐकत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, सध्याची परिस्थिती पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल. नेते पक्ष देशाला ज्याप्रकार लुटत आहेत ते पाहून तुम्हालाही राग येत असेल. तुम्हालाही काहीतरी करायचं आहे. आता ती वेळ आली. आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला.
आता हा इन्कलाब देशभरात पसरेल. सर्व महिला, तरुण, शेतकरी, मजूर, उद्योगपती यांन आता आम आदमी पक्षात प्रवेश करावा. मी काय करू शकतो, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र चन्नींना कुणी हरवलंय हे तुम्हाला माहिती आहे का, लाभसिंग उगोके या मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने चन्नींना पराभूत केलं आहे. आपची सामान्य महिला जीवनज्योत कौर यांनी सिद्धूंना पराभूत केलंय. आम आदमीमध्ये खूप शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. सर्वांनी आपली ताकद ओळखा, आत देशभरात इन्कलाब आणायचा आहे, असे आवाहन केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यावर व्यवस्था बदलली नाहीत तर काही होणार नाही, असं भगतसिंग यांनी म्हटलं होतं. गेल्या ७५ वर्षांत हे पक्ष आणि राजकारण्यांनी सिस्टिम बदलली नाही. लोकांना जाणून बुजून गरीब ठेवलं. आपने सिस्टिम बदलली. लोकांची काम व्हायला लागतील. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह यांचं स्वप्न पूर्ण व्हायला लागलं आहे, असे केजरीवाल म्हणाले.
I'd like to congratulate my younger brother Bhagwant Mann for becoming Punjab Chief Minister. AAP has crossed over 90 seats, results are still coming; people have put a lot of faith in us, we won't break it. We will change this country's politics: AAP convener Arvind Kejriwal pic.twitter.com/uLCqVBbDbQ
— ANI (@ANI) March 10, 2022
हे लोक म्हणजे मोठ्या शक्ती आहेत. हे लोक देशाला रोखण्याचं काम करताहेत. पंजाबमध्ये हे सर्व आपविरोधात एकत्र झाले होते. आप जिंकता कामा नये, यासाठी प्रयत्न सुरू होते. शेवटी केजरीवाल दहशतवादी आहे असे म्हणाले. आज या निकालांमधून जनतेने केजरीवाल दहशतवादी नाही, तर देशाचा सुपुत्र आहे, देशभक्त आहे हे सिद्ध झाले. केजरीवाल दहशतवादी नाही तर तुम्ही दहशतवादी आहात हे निकालांनी दाखवून दिले.
आज आपण सर्वांनी संकल्प करून की एक नवा भारत बनवू, ज्यात द्वेष नसेल, सर्वजण एकमेकांवर प्रेम करेल. कुणी उपाशी राहणार नाहीत. महिला सुरक्षित राहतील. गरीब श्रीमंतांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आपण असा भारत बनवू जिथे खूप मेडिकल, इंजिनियरिंगचे कॉलेज सुरू होतील. भारतातील विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत, तर बाहेरचे विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.