तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:27 AM2023-12-08T11:27:23+5:302023-12-08T11:28:09+5:30
Assembly Election Result 2023: एकीकडे भाजपा आणि मोदींची लाट आली असताना आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बंपर यश मिळालं असताना भाजपाचे ९ खासदार मात्र या निवडणुकीत पराभूत झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपानं तीन राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने मध्य प्रदेशमधील सत्ता राखताना राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्यं काँग्रेसकडून हिसकावून घेतली. मात्र एकीकडे भाजपा आणि मोदींची लाट आली असताना आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बंपर यश मिळालं असताना भाजपाचे ९ खासदार मात्र या निवडणुकीत पराभूत झाले. भाजपाने या निवडणुकीत एकूण २१ खासदारांना तिकीट दिले होते. त्यापैकी १२ खासदारांनी विजय मिळवला. तर ९ खासदारांना विधानसभेच्या मैदानात अपयश आले.
भाजपाने विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवताना आवश्यकतेनुसार काही खासदारांनाही उमेदवारी दिली होती. त्यात भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी ७ खासदारांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती. तर छत्तीसगडमध्ये ४ आणि तेलंगाणामध्ये ३ खासदारांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती.
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गन सिंह कुलस्ते, राकेश सिंह, गणेश सिंह, रीती पाठक आणि राव उदय प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, राकेश सिंह, रीती पाठक आणि राव उदय प्रताप सिंह यांनी विजय मिळवला. तर फग्गन सिंह कुलस्ते आणि गणेश सिंह यांना पराभवाचा धक्का बसला.
राजस्थानमध्ये भाजपाने राज्यवर्धन सिंह राठोड, दीया कुमारी, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, देवजी पटेल आणि भागिरथी चौधरी यांच्यासह राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा या सात खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्यापैकी चार खासदार राज्यवर्धन सिंह राठोड, दीया कुमारी, बाबा बालकनाथ आणि किरोडीलाल मीणा यांनी विजय मिळवला. तर नरेंद्र कुमार, देवजी पटेल आणि भागिरथी चौधरी हे पराभूत झाले.
छत्तीसगडमध्ये भाजपाने केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, गोमती साय, अरुण साव आणि विजय बघेल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यापैकी विजय बघेल वगळता इतर तीनही खासदार निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. तर तेलंगाणामध्ये भाजपाने बंडी संजय, अरविंद धर्मपुरी आणि सोयम बापूराव यांना उमेदवारी दिली होती. हे तिघेही निवडणुकीत पराभूत झाले.