विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:24 PM2024-08-17T12:24:30+5:302024-08-17T12:34:38+5:30

मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे.

Assembly Elections BJP In Haryana Hat-Trick Attempt There will be a direct fight with the Congress | विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: हरयाणात १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यंदा भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून हॅट्ट्रिक करण्यासाठी रणनीती आखत आहे.

माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या विरोधात हरयाणा मांगे हिसाब, हे अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मुख्यमंत्री नायब सिंह सैनी प्रत्येक घटकाला खुश करण्यासाठी घोषणा करत आहेत. मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे.

तिकिटांसाठी दाेन्ही पक्षांत रस्सीखेच

९० जागांसाठी काँग्रेसला तिकिटासाठी २५०० पेक्षा जास्त अर्ज मिळाले आहेत. तर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटले आहे की, भाजप यंदा कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार तिकिटावर निर्णय घेऊ.
हरयाणात सध्या काँग्रेसचे २८ आमदार आहेत. यात विरोधी पक्षनेते हुड्डा वगळता सर्व आमदारांनी पुन्हा तिकिटासाठी अर्ज दिला आहे. एकूण ९० जागांपैकी १७ जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान यांनी सांगितले की, अर्जाची यादी दिल्लीत पाठविली जाईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते तिकीट वाटपावर मंथन करतील. 

हरयाणात निवडणुकीत कोण मारणार बाजी? या आहेत जमेच्या, कमकुवत बाजू

 

  • भारतीय जनता पक्ष

- हरयाणात १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपची बूथस्तरापर्यंत मजबूत संघटनात्मक बांधणी, निवडणुकांच्या पूर्वतयारीत आघाडी. 
- भाजपला सत्ताविरोधी भावनेचा (अँटी इन्कंबन्सी) सामना करावा लागणार.
- भाजपची मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, त्यांचे  पूर्ववर्ती एम. एल. खट्टर यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक प्रशासन यांवर भिस्त.
- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी पाच जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेसचे
जोरदार आव्हान.

  • काँग्रेस

- दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपिंदर सिंग हुडा, कुमारी सेलजा आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांचा वैयक्तिकरीत्या मोठा प्रभाव.
- हुड्डा आणि सेलजा यांच्यातील दुहीचा फटका बसण्याची शक्यता. 
- राज्यात काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या घोटाळ्यांचे भाजपकडून भांडवल.
- काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा फायदा होऊ शकतो.
- आयएनएलडी आणि जेजेपी यांसारख्या पक्षांमध्ये जाट मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसला फटका
बसू शकतो.  

Web Title: Assembly Elections BJP In Haryana Hat-Trick Attempt There will be a direct fight with the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.