भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; आणखी एक बडा नेता हाती कमळ घेऊन सुरू करणार नवी इनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:01 AM2021-06-16T11:01:08+5:302021-06-16T11:06:57+5:30
थोड्याच वेळात भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा; चर्चांना उधाण
नवी दिल्ली: पुढील वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. थोड्याच वेळात भाजपमध्ये एक बडा नेता प्रवेश करणार आहे. तशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. मात्र हा नेता नेमका कोण, याबद्दल भाजपनं माहिती दिलेली नाही. भाजपनं नेत्याचं नाव गुलदस्त्यात ठेवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याची तयारी भाजपनं आतापासून सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी कमळ हाती घेतलं. ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. जितिन यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाची भाजपवर असलेली नाराजी काही प्रमाणात दूर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
२०२२ मध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणीपूरमध्ये निवडणूक होणार आहे. यापैकी उत्तरप्रदेश भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं राज्यात ३०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. २०२२ मध्ये होणारी निवडणूक २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमी फायनल मानली जात आहे.