महामंडळांवरील नियुक्त्या ऑगस्टअखेर

By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

Assignments to corporations by August | महामंडळांवरील नियुक्त्या ऑगस्टअखेर

महामंडळांवरील नियुक्त्या ऑगस्टअखेर

Next
>रावसाहेब दानवे : घटक पक्षांबाबतचे सूत्र ठरले

जालना : राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या काही कारणास्तव रखडल्या होत्या. त्या आता ऑगस्टअखेर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दानवे म्हणाले, महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी पक्षांतर्गत अनेक जण इच्छुक होते. तसेच घटक पक्षांच्या वाट्याचे सूत्रही ठरवायचे असल्याने त्या रखडल्या होत्या. मात्र, हा घोळ संपला असून, ऑगस्टअखेर नियुक्त्या होतील.
२१ माजी आमदार आणि ७ विद्यमान आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. परंतु पक्षाश्रेष्ठींच्या आदेशानुसार सर्वांना एकाच वेळी पक्षप्रवेश न देता संबंधित नेत्याला त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाद्वारे पक्ष प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेतील अधिवेशनात कामकाज होत नसल्याबाबत विचारले असता, विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करीत असून, भाजपाची सर्व विषयांवर चर्चेची तयारी आहे. पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले आहे. मात्र, विरोधकांनी गोंधळ घातला. अधिवेशनाचे कामकाज चालू न देणे हे लोकशाहीसाठी हिताचे नसल्याचे ते म्हणाले.
जालना व वर्धा येथील ड्रायपोर्टबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाल्याचे सांगून केंद्राने जेएनपीटीला ९४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी जिल्हाधिकार्‍यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. तर जेएनपीटीने परस्पर भूसंपादन करावे, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली आहे. त्या वादात भूसंपादनाचा मुद्दा प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्धा आणि जालना ड्रायपोर्टमुळे जालना-खामगाव रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Assignments to corporations by August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.