वाराणसीत असिस्टंट कमिश्नरची आत्महत्या, स्वत:वर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:39 AM2021-05-18T09:39:09+5:302021-05-18T09:47:59+5:30
संजय शुक्ला हे मूळ आझमगढचे रहिवाशी होते, सोमवारी रात्री पत्नीसोबत त्यांनी जेवण केले. त्यानंतर, ते आपल्या रुममध्ये निघून गेले. मात्र, रात्री उशिरा त्यांच्या खोलीतून गोळी चालविल्याचा आवाज आला.
लखनौ - वाराणसीमध्ये कर्तव्यावर असलेल्या सहायक आयुक्त जीएसटी संजय शुक्ला यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोमतीनगर येथील सरयू अपार्टमेंटमधील आपल्या राहत्या घरीच ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन त्यांचा शस्त्र परवाना आणि शस्त्र, काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरात लाखो रुपयांची चोरीही झाली होती.
संजय शुक्ला हे मूळ आझमगढचे रहिवाशी होते, सोमवारी रात्री पत्नीसोबत त्यांनी जेवण केले. त्यानंतर, ते आपल्या रुममध्ये निघून गेले. मात्र, रात्री उशिरा त्यांच्या खोलीतून गोळी चालविल्याचा आवाज आला. त्यामुळे, त्यांच्या पत्नीने रुमकडे धाव घेतली असता, संजय शुक्ला हे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याच अवस्थेच तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, गोमतीनगरच्या एसीपी श्वेता श्रीवास्तव यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर धाव घेतली.
संजय यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यासाठी, पोलिसांनी शेजारील व्यक्तींशी चौकशी केली असून त्यांचे कॉल डिटेल्सही तपासण्यात येत आहेत. तसेच, आझमगढ येथील त्यांचे नातेवाईकही गोमतीनगरला येत आहे. पोलिसाकडून त्यांचीही चौकशी करण्यात येईल. दरम्यान, पत्नीसोबत काही वाद झाला होता का, याचीही चौकशी होत आहे.
संजय यांच्या घरात 6 महिन्यांपूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यामध्ये, लाखोंचे सामान चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेनंतर संजय यांनी पोलिसांत तक्रार देऊन चोरट्यांचा तपास लावणाऱ्या टीमला 50 हजारांच बक्षीसही जाहीर केलं होतं. मात्र, चोरीच्या घटनेपासूनचे ते तणावात होते, असेही सांगण्यात येत आहे.