बनावट संदेश रोखण्याचे व्हॉट्सअॅपचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:40 AM2018-07-24T01:40:03+5:302018-07-24T01:40:22+5:30
सीओओंनी घेतली माहिती तंत्रज्ञान सचिवांची भेट
-संतोष ठाकूर
नवी दिल्ली : जमावाकडून मारहाणीच्या (मॉब लिंचिंग) चिथावणीला कारण ठरत असलेले व वेगाने पसरणारे बनावट संदेश आणि त्यातील व्हॉटसअॅपच्या व्यापक भूमिकेवरून सरकारने कठोर पवित्रा घेतल्यानंतर व्हॉटसअॅपचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर मॅथ्यू इर्डिमा यांनी तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.
मॅथ्यू इर्डिमा यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयात सोमवारी पाचारण करण्यात आले होते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इर्डिमा यांना स्पष्ट केले की, या प्रकरणी माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यापासून सरकारमध्ये असे मत बनले आहे की व्हॉटसअॅप्प तंत्रज्ञानाच्या साह्याने बनावट संदेश रोखण्यासाठी परिणामकारक पावले उचलणार नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याच्याकडून लवकरच कारवाई झाली पाहिजे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या कठोर भूमिकेनंतर व्हॉटसअॅपच्या सीओओंनी बनावट संदेश रोखण्यासाठी वेगाने पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती व तंत्रज्ञान सचिव अजय साहनी यांना आपल्या प्रतिनिधी मंडळासह भेटायला आलेले इर्डिमा यांनी बनावट संदेश रोखण्यासाठी लवकरच परिणामकारक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. सहानी यांनी रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलेली चिंताही त्यांना कळवली व तुमच्याकडून सर्व ती पावले उचलावीत, असे सांगितले. फॉरवर्ड लिहून येणाºया संदेशांसोबत फॉरवर्ड संदेश फक्त पाच ग्रुपमध्येच पाठवण्याचा उल्लेख करून इर्डिमा म्हणाले की, हे पाऊल माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मिळालेल्या नोटिशीनंतर उचलले गेले आहे. यावरून आम्ही भारत सरकारसोबत काम करू इच्छितो हेच यातून दिसते. आम्ही इतरही पावले उचलत आहोत. नुकतेच रविशंकर प्रसाद म्हणाले होते की, व्हॉटसअॅपने हे बघावे की शेवटी एकावेळी विशिष्ट भागात विशेष संदेश मोठ्या संख्येने कसा प्रसारित होत आहे. अशा संदेशांना संशयास्पद मानून ते शोधून काढून स्थानिक पोलीस यंत्रणेसोबत काम करावे. त्यातून असे संदेश वाचून संभाव्य दुर्घटना थांबवता येईल.