अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:14 AM2018-10-24T04:14:35+5:302018-10-24T04:15:04+5:30
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीबीआयकडून बडोद्यात चौकशी सुरु झाली आहे.
नवी दिल्ली / बडोदा : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीबीआयकडून बडोद्यात चौकशी सुरु झाली आहे. अस्थाना यांच्या मुलीच्या लग्न समारंभाबाबतची माहिती चार हॉटेल्सकडून घेतली आहे. तर, त्यांच्या जवळच्या १२ लोकांकडूनही माहिती घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्थाना कुटुंबीयांना या ठिकाणांचा लाभ नि: शुल्क मिळाला होता. केटरिंग आणि अन्य सेवांचे पेमेंट चेक आणि के्रडिट कार्डच्या माध्यमातून केले होते. या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ज्या हॉटेल्सची चौकशी करण्यात आली त्यात लक्ष्मी विलास पॅलेस, हॉटेल एक्स्प्रेस टॉवर, सनसिटी क्लब आणि सूर्या पॅलेस हॉटेल यांचा समावेश आहे.
सीबीआयच्या दस्तऐवजांनुसार, हॉटेल एक्स्प्रेस टॉवरकडून केटरिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांनी कोणताही चार्ज घेतला नाही. हॉटेल एक्स्प्रेस टॉवर्सने लेखी दिले आहे की, आम्ही केवळ या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था केली होती. अन्य सेवा दिल्या नव्हत्या. तसेच याचे कोणतेही शुल्क घेतले नव्हते. अस्थाना यांच्या नजिकच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, चेकच्या माध्यमातून काही जणांचे पेमेंट करण्यात आले होते. सन २००८ ते २०११ या काळात अस्थाना हे बडोद्यात पोलीस आयुक्त होते. त्यामुळेच त्यांना या सेवा मोफत मिळू शकल्या, असे सांगण्यात येत आहे.
दस्तऐवजावरून असे दिसते की, बडोद्याच्या सर्वात जुन्या पंचतारांकित स्टार हॉटेल ‘द ग्रँड मर्क्युअर सूर्या पॅलेस’कडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. देशातून आलेल्या १२०० लोकांच्या बिलापोटी अस्थाना यांच्या पत्नीने १० लाख रुपयांचे बिल दिले होते. सीबीआयने सर्व पावत्या पुरावे म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. रोषणाई आणि म्युझिकची व्यवस्था करणारे सुनील नाईक यांनी सांगितले की, या समारंभासाठी आम्ही सेवा दिली होती. पण, मनीष ठक्कर यांच्याकडून आम्ही उप ठेकेदार होतो. अस्थाना यांनी आमचे पेमेंट चेकद्वारे केले.