संपूर्ण स्वदेशी ‘अस्त्र’ हवाईदलासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:36 AM2019-09-30T04:36:17+5:302019-09-30T04:36:43+5:30
आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे.
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) १५ वर्षांच्या खडतर प्रयत्नांनंतर विकसित केलेले आवाजाहूनही अधिक वेगवान आणि हवेतील लक्ष्याचा हवेतूनच वेध घेऊ शकणारे ‘अस्त्र’ हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांवर बसवून प्रत्यक्ष वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय हवाई दल त्यांच्या ‘सुखोई-३० एमके आय’ लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी अशी किमान २०० क्षेपणास्त्रे सुरुवातीला घेईल, अशी ‘डीआरडीओ’ला आशा आहे.
‘डीआरडीओ’चे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, सध्या जगात या श्रेणीची जी सर्वोत्तम क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत त्यात ‘अस्त्र’चा समावेश होतो. सध्या हे क्षेपणास्त्र ११० कि.मी.पर्यंत दूरवरच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ही क्षमता १६० कि.मी.पर्यंत वाढविण्याचे काम याआधीच सुरू करण्यात आले आहे.
हल्ला परतविण्याची संपूर्ण सुसज्जता असलेले व अत्यंत वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या हवेतील कोणत्याही लक्ष्याचा दूरवरून अचूक वेध घेऊ शकणारे असे क्षेपणास्त्र बनविण्याचेतंत्रज्ञान आत्मसात करणाºया अमेरिका, रशिया, फ्रान्स व इस्रायल या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारताने स्थान पटकावले आहे. भारताने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला केला तेव्हा आपल्या आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची हवेत जी झटापट झाली तेव्हा अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले होते.
गेल्या आठवड्यात ‘डीआरडीओ’ने ओडिशात चांदीपूर किनाºयावरून ही ‘अस्त्र’ क्षेपणास्त्रे प्रत्यक्ष ‘सुखोई’ लढाऊ विमानांवर बसवून त्यांच्या पाच यशस्वी चाचण्या घेतल्या. त्या चाचण्यांमध्ये सर्व हवाई लक्ष्यांचा ८० ते ८६ कि.मी. अंतरावरून अचूक वेध घेण्यात आला. त्यामुळे आता ही क्षेपणास्त्रे प्रत्यक्ष लष्करी सेवेसाठी परिपूर्णतेने सज्ज असल्याची ग्वाही मिळाली.
हे क्षेपणास्त्र बनविताना जे तंत्रज्ञान विकसित झाले त्याचा उपयोग आणखी वेगळ्या प्रकारची व जास्त क्षमतेची हवेतून हवेत व जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी केला जाऊ शकेल.
‘अस्त्र’ची काही वैशिष्ट्ये
बांधेसूद, निमुळता आकार
३.५७ मीटर लांबी
एकूण वजन १५४ किलो
वेग आवाजाच्या चौपट
उत्पादन खर्च प्रत्येकी ७ ते ८ कोटी रु.
भारत डायनॅमिक्स या सरकारी कारखान्यात उत्पादन
सध्या रशिया, फ्रान्स व इस्रायलकडून घेण्यात येणाºया क्षेपणास्त्रांहून स्वस्त