दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतं 'हे' शहर; कारण वाचून वाटेल अभिमान, तुम्हीही कराल सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:45 AM2022-01-31T11:45:55+5:302022-01-31T11:47:24+5:30
देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला.
नवी दिल्ली - तेलंगणात एक असं शहर आहे जिथे लोक दररोज सकाळी 52 सेकंदांसाठी स्तब्ध होतात. यामागचं खरं कारण समजल्यावर तुम्हालाही अभिमान वाटेल. देशभक्तीने या शहरातील लोकांची सुरुवात होते. रोज सकाळी 8.30 वाजता नलगोंडातील बारा प्रमुख ठिकाणी राष्ट्रगीत वाजतं आणि तिथले सर्वच लोक त्याच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथील जन गण मन उत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हळूहळू एक ट्रेंड सेट होऊ लागला.
जन गण मन उत्सव समितीचे अध्यक्ष कर्णती विजय कुमार आणि त्यांच्या मित्रांची हा ट्रेंड सेट करण्यामागे कल्पना आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शहरात जर अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत म्हणण्यात आलं तर अशाने लोकांच्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल. गेल्या वर्षीपासून बरोबर 8.30 वाजता ठीक 52 सेकंदांसाठी सर्व नागरिक राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहतात. नलगोंडा येथे 12 प्रमुख ठिकाणी लाउडस्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येतं.
2020 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार होता. परंतु निवडणूक आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन कारणांमुळे हा उपक्रम पुढं ढकलण्यात आला. हळूहळू नलगोंडाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात तिप्परथ्थी (tipparthi) या नलगोंडाजवळील गावातही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं समितीने सांगितलं. त्यानंतर शहराजवळील अजून काही गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील लोकांना 8.30 वाजता राष्ट्रगीत वाजण्याची सवयच झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.