Atal Bihari Vajpayee : वो सुबह कभी तो आएगी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:30 AM2018-08-17T05:30:34+5:302018-08-17T05:30:47+5:30
अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत.
नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत. चांदणी चौकात त्यांचे वास्तव्य होते. सुमारे ६० वर्षे अटलजींचे दिल्लीशी ॠणानुबंध होते. वाजपेयी देशाचे नेते होते. लोकप्रिय होते. दिल्लीवर त्यांचे विशेष प्रेम. इथले गल्लीबोळ त्यांना माहीत होते. खाऊगल्ल्यांपासून ते चित्रपटगृहांपर्यंत वाजपेयींची फिरस्ता असे.
अटलजी व जगदीश प्रसाद माथुर जनसंघातर्फे प्रथमच निवडून आले होते. दोन्ही नेते चांदणी चौकातच छोट्याशा खोलीत राहात असत. जवळ फारसे पैसे नसायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व पुढे पूर्णवेळ राजकारणी असल्याने वाजपेयींकडे पैसे नसतच. त्यामुळे खासदार असतानाही ते पायीच संसदेत येत. खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांनी अटलजींनी पहिल्यांदा त्यांच्या या सहकाऱ्यास रिक्षाने संसदेत जाऊ , असे सांगितले. माथुर यांना आश्चर्य वाटले. खासदारपदाचे सहा महिन्यांचे एकत्रित वेतन मिळाल्यानेच रिक्षाची चैन करण्याची इच्छा वाजपेयींनी व्यक्त केली. जनसंघ-भाजपाच्या विस्तारासाठी वाजपेयींनी सायकलवरून अनेक शहरे पिंजून काढली. त्यांचा साधेपणा दिल्लीतही कायम राहिला.
त्यांच्यासोबत १९५३पासून असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना त्या गोष्टी आजही लख्खपणे आठवतात. त्या वेळी जनसंघाचे कार्यालय अजमेरी गेट येथे होते. अडवाणी आणि अटलजी नेहमी अजमेरी गेट ते झंडेवालापर्यंत टांग्यातून भोजनासाठी जात असत.
दिल्लीजवळील नयाबांस येथील पोटनिवडणुकीत जनसंघाला यश मिळाले नाही. त्या वेळी त्यांनी निराश झालेल्या अडवाणी यांना जवळच्याच पहाडगंजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी नेले. तेथे कोणता चित्रपट प्रदर्शित झाला होता, ते दोघांनाही माहीत नव्हते. राज कपूर यांचा ‘वो सुबह कभी तो आएगी’ हा चित्रपट सुरू होता. त्या चित्रपटाचा फलक पाहून अडवाणी वाजपेयींना म्हणाले, ‘हम आज हार गये, लेकिन देखना, वो सुबह फिर जरुर आएगी.’ आणि खरोखरच जनसंघाच्या काळात नव्हे, तरी भाजपासाठी ती सुबह आली आणि वाजपेयी पंतप्रधानही झाले!