Atal Bihari Vajpayee : वाजपेयींसाठी बदलला बंगल्याचा पत्ता, यूपीएच्या कारकिर्दीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:26 IST2018-08-17T05:25:57+5:302018-08-17T05:26:58+5:30
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘लुटियन्स’ परिसरातील सरकारी बंगल्याचा पत्ता क्रमांकासह पहिल्यांदाच २००४ मध्ये विशेषत: अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी बदलण्यात आला.

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींसाठी बदलला बंगल्याचा पत्ता, यूपीएच्या कारकिर्दीत निर्णय
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘लुटियन्स’ परिसरातील सरकारी बंगल्याचा पत्ता क्रमांकासह पहिल्यांदाच २००४ मध्ये विशेषत: अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी बदलण्यात आला. त्या वेळी भाजपाच्या पराभवानंतर काँग्रेस सत्तारूढ होणार होती. माजी पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना कृष्णा मेनन मार्गावरील ८ नंबरचा सरकारी बंगला देण्यात आला होता; परंतु वाजपेयी यांनी बंगल्याला ७ ऐवजी ७-ए असा नंबर देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सरकारने त्यादृष्टीने बदल करण्याची तयारीही सुरू केली. नंतर असे लक्षात आले की, ७ किंवा ७-ए असा नंबर देणे शक्य नाही. लुटियन्स दिल्लीत एकीकडे एकेरी तर दुसरीकडे दुहेरी क्रमांकाचे बंगले आहेत. तेव्हा बंगल्याला ७ किंवा ७-ए असा नंबर देता येत नाही. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान वाजपेयी यांच्या सूचनेनुसार बंगल्याला ६-ए असा क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. लुटियन्स दिल्लीत पहिल्यांदाच एखाद्या बंगल्याचा क्रमांक अधिकृतपणे बदलण्यात आला होता
त्या वेळी लुटियन्स दिल्लीतील सरकारी बंगल्यांची देखभाल करणारे प्रभारी मुख्य अभियंता एल. पी. श्रीवास्तव यांनी सांगितले, बंगल्याचा नंबर बदलण्याची सर्व कार्यवाही कायदेशीर मार्गानेच करण्यात आली होती. त्यासंबंधीची संचिका मंजूर करण्यात आली होती. सजावट किंवा बंगल्यात विशेष बदल करण्यासंबंधी कोणताही सल्ला त्यांनी दिला नव्हता. साधी राहणी, उच्च विचारसरणीचे वाजपेयी यांना जेव्हा हा बंगला दाखविण्यात आला; तेव्हा त्यांनी आत चक्कर मारून पाहणी केल्यानंतर संमती दिली
फुलझाडे, झुडपे आणि वृक्षांना कोणत्याही प्रकारे नुकसान न पोहोचविण्याचा सल्ला मात्र त्यांनी आवर्जून दिला होता. नवीन पंतप्रधान रेसकोर्स रोडस्थित बंगल्यात राहण्यास येणार असल्याने लवकरात लवकर मी नवीन घरात जायला हवे, असे सांगत कमीतकमी वेळेत बंगला तयार करण्याचा सल्ला वाजपेयी यांनी दिला होता. तेव्हा आम्ही ४५ दिवसांची मुदत मागितली होती
वाजपेयी २००४ मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजेदरम्यान नव्या बंगल्यात राहण्यास आले होते. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांनीही आपल्या सरकारी बंगल्याचा नंबर २ ऐवजी २-ए, मोतीलाल नेहरू मार्ग असा बदलला होता. भरतसिंह सोळंकी यांनीही बंगल्याचा नंबर बदलण्याची विनंती केली होती; परंतु ती मान्य झाली नव्हती.