Atal Bihari Vajpayee Death: ‘तेजस’ ची ‘अटल’ भरारी; इंजिननिर्मितीला मिळाले फ्रान्सचे सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 09:40 PM2018-08-16T21:40:34+5:302018-08-16T21:41:00+5:30
Atal Bihari Vajpayee Death: लढाऊ विमानासाठी इंजिन तयार करणे हे एक कठिण काम असते. जगातील केवळ निवडक विकसित देश हे काम करीत असताना भारताला या श्रेणीत नेण्याचे महत्त्वाचे कार्य अटलबिहारी वाजपेयींनी केले.
- चिन्मय काळे
मुंबई : लढाऊ विमानासाठी इंजिन तयार करणे हे एक कठिण काम असते. जगातील केवळ निवडक विकसित देश हे काम करीत असताना भारताला या श्रेणीत नेण्याचे महत्त्वाचे कार्य अटलबिहारी वाजपेयींनी केले. ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या निमित्ताने ‘कावेरी’ नावाच्या या इंजिन निर्मितीला वाजपेयींच्या धोरणी नेतृत्वात बळ मिळाले होते.
स्वदेशी बनावटीचे ‘लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट’ (एलसीए)या लढाऊ विमानाचे १९८७ पासून भारतात संशोधन सुरू होते. पण या विमानाची पहिली यशस्वी चाचणी ४ जानेवारी २००१ ला पंतप्रधान या नात्याने वाजपेयी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे झाली. जगातील सर्वात छोट्या या लढाऊ विमानाचे ‘तेजस’ हे नामकरणसुद्धा त्यावेळी वाजपेयींनीच केले. परंतु तो काळ अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा होता. या निर्बंधाचा अडसर ‘तेजस’ च्या पुढील प्रवासात होता. तो वाजपेयींनीच्या कुशलतेने दूर झाला.
१९९८ च्या पोखरण अणुचाचणीमुळे अमेरिकेने भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आणले होते. त्यामुळे ‘तेजस’ला बसविण्यात येणाऱ्या ‘कावेरी’ इंजिनासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहकार्य अमेरिका किंवा अन्य देशांमधून मिळवणे भारताला कठीण झाले होते. ‘तेजस’च्या निर्मितीतील हा अडथळा दूर करण्यात अटलबिहारी वाजपेयींची प्रखर मुत्सद्देगिरी त्यावेळी कामात आली. फ्रान्सकडून या इंजिनाच्या निर्मितीसाठी तांत्रिक सहकार्य मिळविण्यात डीआरडीओला यश आले. फ्रान्समधील साफरान (स्नेकमा) कंपनीने कावेरी निर्मितीसाठी सहकार्य दिले. निर्बंधांचा दबाव झुगारुन फ्रान्स सरकारला या सहकार्यासाठी तयार करण्याची कामगिरी डीआरडीओ केवळ वाजपेयींमुळेच करू शकला.
आज ‘एलसीए तेजस’ हे विमान हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट आहे. अन्य काही तांत्रिक कारणांमुळे सध्याच्या ‘तेजस’ ला कावेरी इंजिन बसविण्यात आलेले नाही. पण ‘तेजस २’ ही पुढील टप्प्यातील अत्याधुनिके विमाने ‘कावेरी’ने सज्ज केली जाणार आहेत. त्याखेरीज विमाननिर्मिती करणा-या विदेशी कंपन्यांना या इंजिनांची निर्यात करण्याचेही डीआरडीओचे लक्ष्य आहे. याचे श्रेय वाजपेयींनाच जाते.