Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:37 PM2018-08-16T17:37:25+5:302018-08-16T17:54:35+5:30
Atal Bihari Vajpayee: वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्लीः बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा...
या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाची सांगता झाल्याची भावना व्यक्त होतेय. माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयींचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 66 दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते.
Former Prime Minister & Bharat Ratna #AtalBihariVaajpayee passes away in AIIMS. He was 93. pic.twitter.com/r12aIPF5G0
— ANI (@ANI) August 16, 2018
वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. वाजपेयी यांच्या निधनामुळे सर्वांना सोबत घेऊन चालणारा सहिष्णू नेता हरपल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
एम्समध्ये उपचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दोनदा अटलबिहारी वाजपेयींची भेट घेऊन डॉक्टरांकडे प्रकृतीची विचारपूस केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राहुल गांधी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींची भेट घेतली होती.
मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2018
हम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2009 पासून आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपाच्या कार्यक्रमात दिसलेले नव्हते.