Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 04:41 AM2018-08-18T04:41:35+5:302018-08-18T04:41:50+5:30

‘अटलबिहारी अमर रहे' हीच घोषणा हजारो मुखांतून येत होती.

Atal Bihari Vajpayee: ... the name of Atalji will remain! | Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा

Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा

Next

नवी दिल्ली : ‘अटलबिहारी अमर रहे' हीच घोषणा हजारो मुखांतून येत होती. कोणी झाडांवर चढून बसलेले होते तर कोणी रस्त्याला कडेला जिथे जागा मिळेल तिथे. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयाकडे नेले जात असतानाचे हे दृश्य होते.
नेत्यास श्रद्घांजली वाहण्यासाठी देशभरातून आलेले नेते, आबालवृद्ध, स्त्री-पुरुष आले होते. कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी नेत्यांची रीघ लागली होती. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख बिपीन रावत, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लानबा, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ममता बॅनर्जी, नितीशकुमार, नवीन पटनायक, पलानीस्वामी हे मुख्यमंत्री तसेच द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आदी नेतेही आले होते.
भाजपा कार्यालयात पार्थिव नेण्यास विलंब झाला. लष्कराने ती व्यवस्था केली होती. फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनावर वाजपेयी यांचे राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव होते. हजारो लोक ‘जबतक सूरज चाँद रहेगा, अटलजीका नाम रहेगा' अशा घोषणा देत होते.
वाजपेयी यांचे निवासस्थान ते भाजपा मुख्यालय हे पाच किमीचे अंतर कापायला या यात्रेला सुमारे एक तास लागला. पार्थिव तिथे पोहोचण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेते तिथे पोहोचले होते.

ख्यातकीर्त नेता गमावला - दलाई लामा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताने ख्यातकीर्त राष्ट्रीय नेता गमावला, अशा शद्बांत तिबेटी धर्मगुरु दलाई यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, ते मला आपला मित्र मानत असत. वाजपेयींनी राजकारणातून निवृत्ती पत्करल्यानंतरही मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात. दलाई लामा यांनी वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य हिला पत्रही लिहिले आहे.

अटलजींच्या नावे पोस्टाचे तिकीट?
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट जारी करुन एक रेल्वेही त्यांच्या नावाने सुरू करण्याचे सरकारने ठरविले आहे. डाक विभागाकडून प्रस्ताव संबंधित समितीकडे जाईल. हे तिकीट दोन श्रेणीत तयार करण्याचा विचार आहे. माजी पंतप्रधान व भारतरत्नचे विजेते म्हणून अशा दोन श्रेणीत तिकीट तयार करण्याचा विचार आहे. वाजपेयी यांच्या नावाने सुरु होणारी रेल्वे बहुधा मध्यप्रदेशातून आणि त्यांच्या जन्मस्थळ ग्वाल्हेरहून असू शकते. त्यांची कर्मभूमी असलेल्या उत्तरप्रदेशातून लखनौमधून रेल्वे चालविली जावी, असा एक प्रस्ताव आहे. अर्थात सरकारचे प्राधान्य त्यांच्या स्मारकाला आहे.त्यांच्या निवासस्थानी संग्रहालय सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत शहरी विकास मंत्रालयाने कोणता निर्णय घेतलेला नाही.

अटलजींनी नजरेनेच मला आशीर्वाद दिले : राष्ट्रपती
अटल बिहारी वाजपेयी यांच्या उत्तुंग आणि उमद्या व्यक्तिमत्त्वानेच प्रभावित होऊन आपण वकिली व्यवसाय सोडून सार्वजनिक जीवनात आलो, असा ऋणनिर्देश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केला. वाजपेयी यांच्या दत्तक कन्या नमिता कौल भट्टाचार्य यांना सविस्तर पत्र लिहून कोविंद यांनी आपल्या शोकसंवेदना कळविल्या. त्यात ते लिहितात की, राष्ट्रपती झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा अटलजी अंथरुणाला खिळून होते. तरीही त्यांनी डोळ््यांनी प्रतिसाद दिला व त्यातूनच मला त्यांचे आशिर्वाद मिळाले. वाजपेयी यांच्यासारख्या विशाल मनाच्या व महान नेत्याच्या जाण्याची हानी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला जाणवेल. ते खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणातील युगप्रवर्तक नेते होते. त्यांना मिळालेले ‘भारतरत्न’ ही त्यांच्यावरील प्रेमाची व ऋणाची पोचपावती होती.


अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा व असंख्य पक्ष कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी भाजपा मुख्यालयात वाजपेयींचे अंतिम दर्शन घेतले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक, बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अबुल हसन महमुद अली, श्रीलंकेचे हंगामी परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरिएला, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप गवली, पाकिस्तानचे हंगामी माहितीमंत्री सय्यद जफर अली, अफगाणिस्ताचे एक वरिष्ठ मंत्री आदी मान्यवरांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.
भाकपचे नेते डी. राजा, माकपचे नेते सीताराम येचुरी यांनीही भाजपा मुख्यालयात जाऊन वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता भाजपा मुख्यालयातून अंतिम संस्कारांसाठी वाजपेयी यांचे पार्थिव राष्ट्रीय स्मृतिस्थळ येथे नेण्यात आले. हजारो लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

स्वामी अग्निवेश यांना दिल्लीत मारहाण
आर्य समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश हे वाजपेयी यांच्या अंतिम दर्शनासाठी जात असताना त्यांना काही जणांनी शुक्रवारी मारहाण केली. भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला आहे. महिनाभरापूर्वीच त्यांना झारखंड येथील पाकुर येथे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला वाटेत घेरले, असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केला. ते म्हणाले की, त्यांनी मारहाण केल्यामुळे माझी डोक्यावरील पगडीही खाली पडली. या भाजपा कार्यकर्त्यांनी मला देशद्रोहीही म्हटले व ते शिव्याही देत होते. हा सारा प्रकार तिथे उभ्या असलेल्या पोलिसांसमोर सुरू होता. या कार्यकर्त्यांत काही महिलांचाही समावेश होता.

पाकिस्तानी सरकार व नेत्यांचीही आदरांजली
पाकिस्तान व भारताचे संबंध सुधारावेत आणि शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत विशेष प्रयत्न केले, अशा शद्बांत पाकिस्तान सरकारने व तेथील महत्त्वाच्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाकिस्तानचे होऊ घातलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी वाजपेयींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाज) या पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, भारत व पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित होण्यासाठी वाजपेयींनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. दोन्ही देशांचाही विकास व्हावा, यावर त्यांचा कटाक्ष होता.

ब्रिटिशांनी ध्वज उतरविला
अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्ताबाहेरील ब्रिटिश ध्वज आज अर्ध्यावर उतरविण्यात आला होता.

Web Title: Atal Bihari Vajpayee: ... the name of Atalji will remain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.