Atal Bihari Vajpayee : वाजपेयी म्हणत, राजकारणात येणं सर्वात मोठी चूक होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:28 AM2018-08-17T04:28:37+5:302018-08-17T04:29:19+5:30
ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती.
ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला खरं तर अध्ययन-अध्यापन करायची इच्छा होती. भूतकाळातून काही घेऊन भविष्याला काही योगदान देण्याची इच्छा होती. मात्र, राजकारणाच्या खडकाळ रस्त्यावर चालताना काही कमावणं तर दूरच, गाठीला होतं, तेही मी घालवून बसलो!’
‘मनाची शांती गेली. एक विचित्र पोकळपण सारं जीवन व्यापून राहिलं. ममता व कारुण्य ही मानवी मूल्यंही आता तोंड फिरवायला लागली आहेत. सत्तेचा संघर्ष विरोधी पक्षीयांशीच नाही, तर स्वपक्षीयांशीही व्हायला लागला आहे. पद आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी जोड-तोड, साठ-गाठ करणं आवश्यक झालं आहे. पण हे सगळं झाल्यानंतरही राजकारणाचा मोह सुटत नाही!’
‘रोज सकाळी वर्तमानपत्रात स्वतचं नाव वाचल्यावर जी नशा चढते ती उतरायचं नावच घेत नाही. बहुधा यामुळंच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वयंसेवकांना वृत्तपत्रीय प्रसिद्धी व स्वागत सत्कारांमध्येच न फसण्याचा इशारा दिला होता. पण आजच्या राजनीतीप्रधान काळात जिथं संस्कृती व समाजाचा विकासही शासनाच्या कृपेवर निर्भर झाला आहे, तिथं स्वतच्या जाहिरातीपासून वाचणं कसं शक्य आहे? साप-मुंगुसासारखी स्थिती झाली आहे. पचवताही येत नाही आणि सोडताही येत नाही....’