Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:13 PM2018-08-16T13:13:22+5:302018-08-16T18:31:22+5:30

आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते.

Atal Bihari Vajpayee: Vajpayee tried to translate Savarkar's poetry ... | Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता...

Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता...

मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम पत्रकार, नेते आणि कवी होते. कवीहृदयाचे पंतप्रधान म्हणून त्यांची विशेष ओळख होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका भाषणामध्ये आपल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या काव्याचे श्रेष्ठत्त्व आपल्या सुंदर रसाळ शैलीमध्ये केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीक पु. ल. देशपांडे होते.

सावरकरांच्या कवी या रुपानंतर मला जर काय भावले असेल तर त्यांचं समाजसुधारक असणं. रत्नागिरीमध्ये नजरकैदैत राहिल्यावरही त्यांनी आपल्या विचारांमध्ये समाजसुधारणा हा विषय ठेवला होता. त्यावेळेस स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी तरी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या मनात अनेक विषय असत. ते समाजाचे शिल्पकार होते, विकृतींशी लढणारे योद्धे होते आणि वाईट चालीरितींचे निर्मूलन करणारे सुधारक होते असे  सावरकरांचे वर्णन अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते. ते म्हणाले होते,
सावरकर माने तेज
सावरकर माने त्याग
सावरकर माने तप
सावरकर माने तत्व
सावरकर माने तर्क
सावरकर माने तारुण्य
सावरकर माने तीर
सावरकर माने तलवार
सावरकर माने तिलमिलाहट
सावरकर माने तितिक्षा
सावरकर माने तिखापन

असे म्हणून वाजपेयी यांनी पुढचे वाक्य मराठीत 'सावरकर म्हणजे तिखट' असे उच्चारले. त्यानंतर एखादी व्यक्ती एकाचवेळेस कवी आणि क्रांतीकारक कशी असू शकते याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिल्याचे सांगत सावरकरांच्या जीवनाचे वैशिष्ट्य सांगितले. शब्दांचे विश्व घेऊन उंच भरारी मारायची आणि त्याचवेळेस परिस्थितीच भान ठेवायचं अत्यंत कठिण असते. अंदमानमध्ये सावरकरांना आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ घालवावा लागला होता. ते शब्दांचे शिल्पकार होते पण त्यांच्या भावना उदात्त होत्या असा शब्दांमध्ये सावरकरांचा गौरव वाजपेयी यांनी केला होता. 

''मला विनायक दामोदर सावरकरांची ओळख एक कवी म्हणूनच झाली होती. सावरकरांच्या कवितांचे गायन आम्ही करत असू. मी ग्वाल्हेरचा असल्यामुळे माझे मराठी फारसे चांगले नव्हते. कारण ग्वाल्हेरची स्वतःची अशी वेगळी मराठी आहे. ती पुणेकरांना समजणार नाही. 'वरचा मजला खाली (रिकामा) आहे' असं मराठी आम्ही बोलतो. जर मजला वरती आहे तर तो खाली कसा असा प्रश्न तुम्हाला पडेल पण ते ग्वाल्हेरचं स्वतःचं मराठी आहे. मी सावरकरांच्या कवितांचा अनुवाद करायचा प्रयत्न केला होता तेव्हा मला त्यांच्या शब्दांच्या शक्तीची कल्पना आली होती. एखादा कवी क्रांतीकारक कसा असू शकतो हा प्रश्न मला पडला होता. कवी कल्पना आणि यथार्थदृष्टी यांचा समन्वय सावरकरांनी केला होता'', अशा शब्दांमध्ये वाजपेयी यांनी सावरकरांच्या शब्दांचे, कवितांचे, त्यांच्या त्यागाचे वर्णन केले होते. वक्तृत्त्वशैलीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी हे भाषण आदर्श उदाहरण ठरेल.

 

 

Web Title: Atal Bihari Vajpayee: Vajpayee tried to translate Savarkar's poetry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.