Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:50 PM2018-08-16T13:50:32+5:302018-08-16T17:55:02+5:30
आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे.
नवी दिल्ली- अटलबिहारी वाजपेयी यांच्या अजातशत्रू स्वभावाची प्रचिती सर्वच पक्षांच्या नेत्यांना येत असे. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे.
किपिंग द फेथ:मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या चॅटर्जींच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत. आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी केली परंतु त्यांना तो परत मिळालाच नाही. पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली. रे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री ओम मेहता यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले. मात्र ओम मेहता आणि सिद्धार्थ शंकर रे यांची याबाबतीत मदत मिळाली नाही.
अखेर आणीबाणी संपल्यावर नवे जनता सरकार केंद्रामध्ये सत्तेत आले. आतातरी आपल्याला पासपोर्ट मिळेल असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना पासपोर्ट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनी चॅटर्जी यांची समस्या जाणून घेतली आणि त्याच संध्याकाळी चॅटर्जी यांना पासपोर्ट मिळवून दिला. पासपोर्ट मिळाला म्हणजे स्वातंत्र्यच मिळाल्यासारखा आपल्याला आनंद झाला असे चॅटर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
अर्थात असे असले तरी सोमनाथ चॅटर्जी यांनी आपल्या राजकीय भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही. सर्वच पक्षांच्या सरकारच्या चुका दाखवून देण्यात आणि योग्यवेळी टीका करण्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली रालोआ सरकार सत्तेत आल्यावर अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हाही चॅटर्जी यांनी आपली विरोधी पक्षातील खासदाराची भूमिका व्यवस्थित पार पाडली.