...तर अटलजींना आवडणार नाही
By Admin | Published: October 7, 2015 02:59 AM2015-10-07T02:59:04+5:302015-10-07T09:26:47+5:30
उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाबाबत जनमानसात उमटत असलेले तीव्र पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
लालकृष्ण अडवाणी : दादरीप्रकरणी मोदी सरकारला चिमटा; राजकारण तापले, आरोप-प्रत्यारोप
आग्रा : उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाबाबत जनमानसात उमटत असलेले तीव्र पडसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात मोदी सरकारला जोरदार चिमटा काढला. दादरीवर बोललो तर अटलजींना ते आवडणार नाही, असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
सोमवारी एका पुस्तक प्रकाशन समारोहासाठी अडवाणी आगऱ्यात आले होते. सध्या देशात जे काही सुरू आहे, ते भाजप सरकारच्या त्रुटी दाखवणारे आहे. या त्रुटी दूर करण्याची गरज आहे. सरकार या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी आणखी बरेच काही करावे लागणार आहे, अशा शब्दात त्यांनी यावेळी मोदी सरकारवर ताशेरे ओढले.
दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या अफवेतून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली होती. या घटनेमुळे केवळ उत्तर प्रदेश सरकारच नाही, तर केंद्र सरकारलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दादरीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत या घटनेची निंदा केली होती. याशिवाय अर्थमंंत्री अरुण जेटली यांनीही दादरी हत्याकांडामुळे देशाचे नाव खराब होत असल्याचे म्हटले होते.
शर्मा, सोम यांच्याविरुद्ध एफआयआरची शिफारस...
इखलाकच्या मृत्यूनंतर दादरीजवळील बिशादा या गावाला भेट देताना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शिफारस केल्यामुळे नवा वाद उभा ठाकला आहे.
उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गौतम बुद्धनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालात शर्मा आणि सोम यांच्यासह बसपाचे माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्यावरही कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या तिन्ही नेत्यांनी गावकऱ्यांना संबोधित केल्यामुळे तेथे लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजयकुमार यादव यांनी केला. दादरी परिसरातील संवेदनशील परिस्थिती पाहता या नेत्यांना केवळ इखलाकच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र त्यांनी जाहीरसभा घेत या नियमांचे उल्लंघन केले. निरपराधांवर गुन्हे दाखल केल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ असे चिथावणीजनक विधान केल्यामुळे मुझफ्फरनगरचे आमदार सोम याआधीच अडचणीत आले आहेत. एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी यांनी इखलाकच्या कुटुंबियांची भेट घेतल्याबद्दलही सोम यांनी कडाडून टीका केली होती. सोम यांच्या विधानाबद्दल कोणती कारवाई करायची याबाबत कायदेशीर मत मागण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले होते.
गोमांस तपासणीसाठी बंदरांवर प्रयोगशाळा : दादरी प्रकरण तापले असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी गोमांसच्या बेकायदा निर्यातीला आळा घालताना बंदरांवर चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बलयान यांनी कृषी निर्यात प्रोत्साहन मंडळ (अपेडा), अन्न प्रक्रिया मंत्रालय, तसेच कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आढावा बैठकीत चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली.