अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 03:03 AM2020-10-04T03:03:27+5:302020-10-04T07:03:20+5:30
PM Narendra Modi inaugurates Atal tunnel: ९ कि.मी. लांबी; हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतील बोगद्याचे उद्घाटन
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्याचे उद्घाटन करताना शनिवारी केले.
मोदी यांनी सांगितले की, अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल. सीमेवरील पायाभूत सुविधांत सुधारणा करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. तथापि, हे प्रकल्प मार्गीच लागत नव्हते. अनेक प्रकल्प नियोजनाच्या पातळीवरच रखडले होते. काही प्रकल्प अर्ध्यावर लटकले होते. सीमा भागातील दळवळण व्यवस्थेचा मुद्दा थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
सीमेवर गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांना अशा प्रकल्पांमुळे रसद पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. विरोधकांनी देशाच्या संरक्षण हिताकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप करून ते म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या बोगद्याचे भूमिपूजन केले होते.
...असा आहे बोगदा
अटल बोगदा मनालीजवळील सोलांग खोरे आणि लाहौल स्पिती जिल्ह्यातील सिस्सू यांना जोडतो. ३ हजार मीटर उंचीवर असलेला हा बोगदा ९.0२ कि. मी. लांब असून तो जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग बोगदा ठरला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग, लष्करप्रमुख बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख एम. एम. नरवणे यांची यावेळी उपस्थिती होती.
रोहतांग खिंडीच्या पश्चिमेला डोंगर पोखरून हा बोगदा तयार करण्यात आला असून त्यामुळे सोलांग आणि सिस्सूमधील अंतर ४६ किमींनी कमी होणार आहे. चार तासांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत होईल. दुहेरी मार्गिका असलेल्या बोगद्यातून रोज ३ हजार कार आणि १,५00 ट्रक ताशी कमाल ८0 कि. मी. वेगाने ये-जा करू शकतील.