आठवले, भामरे केंद्रात!
By admin | Published: July 5, 2016 04:41 AM2016-07-05T04:41:37+5:302016-07-05T07:07:08+5:30
केंद्रातील मोदी सरकारचा मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारचा आज मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले आणि भाजपाचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची नावे पुढे असून, खा. विनय सहस्रबुद्धे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. विस्तारात १२ जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल आणि काहींना बाजूला केले जाईल, असे कळते. मोदी, अर्थमंत्री जेटली आणि अमित शाह यांच्या बैठकीत मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मंत्र्यांचा शपथविधी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रेसिडेन्शिअल पॅलेसमध्ये होणार आहे. जेटली यांच्याकडे असलेले माहिती आणि प्रसारण खाते नव्या मंत्र्यांकडे जाईल, असे कळते. मात्र त्यांच्याकडे कायदा खात्याची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोव्याचे श्रीपाद नाईक यांना पुन्हा राज्यात पाठवले जाणार असल्याचे बोलले जाते.
पक्ष विलीनीकरणास आठवलेंचा नकार
उत्तर प्रदेशातील अनुप्रिया पटेल या अपना दलाच्या असून, त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवली आहे.
त्याच पद्धतीने रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाही भाजपामध्ये विलीन करावा, असे भाजपा नेत्यांनी त्यांना सूचित केले आहे.
मात्र आठवलेंनी मंत्रिपदासाठी पक्षावर तुळशीपत्र ठेवण्यास नकार दिला आहे. त्यांना राज्यमंत्री दिले जाऊ शकते.
कुणाला प्रमोशन, कुणाला डच्चू
फेरबदलामध्ये ज्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान आणि मुख्तार अब्बास नकवी, जयंत सिन्हा यांची नावे आहेत.
त्याचबरोबर कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल, अशी चर्चा आहे. मनसुख बसावा, आर. एस. कथेरिया, एम.के. कुंडारिया, निहालचंद, संवरलाल जाट, विजय सांपला यांनाही डच्चू मिळेल, असे दिसत आहे. सदानंद गौडा यांना मंत्रिपदी ठेवताना त्यांच्याकडील कायदा खाते मात्र काढले जाईल, असे कळते.
सहस्रबुद्धेंचे काय?
सोमवारी अमित शाह यांना अनेक खासदार भेटले. त्यात आठवले, डॉ. भामरे यांच्याबरोबर खा. एस. एस. अहलुवालिया, राजस्थानचे पी. पी. चौधरी, उत्तर प्रदेशातील अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, महेंद्र पांडे, विजय गोयल, एम. जे. अकबर, मध्य प्रदेशचे अनिल दवे, गुजरातचे मनसुखभाई मांडाविया, पुरुषोत्तम रुपाला, फग्गनसिंग कुलस्ते, कृष्ण राज, जसवंतसिंग भाबोरे, अर्जुन मेघवाल आणि अजय टमटा यांचा समावेश होता. दरम्यान, विनय सहस्रबुद्धे यांचा निश्चित समावेश होईल, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
19 नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता असून, सहा जणांना डच्चू मिळू शकतो. मात्र, यात कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले.