कौतुकास्पद! चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार; 5 तासांत जमा केले 91 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:48 AM2022-05-03T11:48:21+5:302022-05-03T11:49:51+5:30

एका चिमुकल्याच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि अवघ्या पाच तासांत तब्बल 91 लाख जमा केले आहे.

Athirampuzha residents raise Rs 91 lakhs in 5 hours for boy’s treatment | कौतुकास्पद! चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार; 5 तासांत जमा केले 91 लाख

प्रातिनिधिक फोटो

Next

नवी दिल्ली - देशात अनेकदा कौतुकास्पद घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका चिमुकल्याच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि अवघ्या पाच तासांत तब्बल 91 लाख जमा केले आहे. सहा वर्षांच्या मुलावरील बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोट्टयममधील अथिरामपुझा पंचायतीत ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे. जेरोम के जस्टिन याच्या वैद्यकीय उपचारांसाठी 30 लाख रुपये जमा करण्याचं लक्ष्य पंचायतीनं ठेवलं होतं. घरोघरी जाऊन मदतीचं आवाहन करण्यात आलं.

कुटुंबाच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले. या निधीतून जमलेले अतिरिक्त 61 लाख रुपये या भागातील अशाच प्रकारच्या वैद्यकीय मदतीची गरज असलेल्यांसाठी ठेवण्याचा निर्णय या पंचायतीनं घेतला असल्याचं अथिरामपुझा पंचायतीचे अध्यक्ष बिजू वालियामाला यांनी सांगितलं. जेरोम हा सहा वर्षांचा मुलगा पुढच्या वर्षी शाळेत जाईल. सात महिन्यांपूर्वी त्याला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्याच्यावरील उपचारांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणही करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र उपचारांवर एवढे पैसे खर्च करण्याची त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नव्हती. 

अथिरामपुझा पंचायतीने त्याच्या उपाचारासाठी पुढाकार घेतला आणि लोकांनी मदत करण्याचं ठरवलं. घरोघरी जाऊन मदतीचं आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक वॉर्डमध्ये पथकं नेमण्यात आली अशी माहिती बिजू यांनी दिली. जेरोम राहत असलेल्या भागातच बिजू राहतात. पंचायतीमधील 22 वॉर्डमध्ये 108 पथकांनी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ही मोहीम राबवण्यात आली. अथिमपुझा जीवन रक्षा समितीच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. चांगनॅसरी प्रथ्यशा या धर्मादाय संस्थेच्या सहकार्याने समितीनं ही मोहीम राबवली.

मुलाचे वडील जस्टीन वर्गीस याच भागात एक छोटं किराणा दुकान चालवतात. आपल्या मुलाच्या उपचारांसाठी इतके पैसे जमा करणं त्यांचा शक्य नव्हतं, अशी माहिती बिजू यांनी दिली. मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक पथकात सात सदस्यांसह एक वॉर्ड प्रमुख नेमण्यात आला होता. मोहीम कशासाठी आहे त्याबाबतची माहिती देणारी पत्रके छापण्यात आली होती. ती रहिवाशांमध्ये वाटण्यात आली. या मोहीमेचा प्रचार करण्यासाठी काही वाहनंही नेमण्यात आली होती. “मदतीची कमीतकमी रक्कम 500 रुपये ठेवण्यात आली होती. मुलाला वाचवण्यासाठी पंचायतीतलं प्रत्येक कुटुंब पुढे आलं आणि त्यांनी मदत केली असं अथिमपुझा जीवन रक्षा समितीचे समन्वयक जॉन जोसफ पारापुराथू यांनी सांगितलं. द न्यू इंडियन एक्सप्रेसने याविषयी वृत्त दिले आहे.
 

Web Title: Athirampuzha residents raise Rs 91 lakhs in 5 hours for boy’s treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा