आॅलिम्पिकमध्ये खेळाडूंनी वर्तनाची छाप सोडावी
By admin | Published: August 1, 2016 01:39 AM2016-08-01T01:39:41+5:302016-08-01T01:39:41+5:30
भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर आपल्या वर्तनाने जगाच्या हृदयात स्थान मिळवण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी भारताच्या ११९ सदस्यांच्या पथकाला शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून जवाहरलाल नेहरू स्टेडियमपर्यंत ‘रन फॉर रिओ’ला रविवारी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडूने हा टप्पा गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून, आॅलिम्पिकमध्ये हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे. यापूर्वी खेळाडूंना तयारी करण्यासाठी अधिक कालावधी मिळत नव्हता; पण आता खेळाडूंना तेथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मिळतो.’’ कार्यक्रमाला क्रीडामंत्री विजय गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. आॅलिम्पिकचे टी-शर्ट परिधान केलेले २० हजार शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करीत रिओमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
‘मन की बात’मध्ये रिओचीच चर्चा
रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी या वेळी देशवासीयांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. त्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी ५ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकचा उल्लेख करताना म्हटले की, विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा खेळाचा महाकुंभ सुरू होत असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्याची जबाबदारी देशवासीयांची आहे. सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात. या खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहोचविण्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशवासी मला नरेंद्र मोदी अॅपवर खेळाडूंच्या नावाने शुभेच्छा पाठवू शकतात. मी तुमच्या शुभेच्छा खेळाडूंपर्यंत पोहोचविणार.’