Atiq Ahmed: तो रोज नशा करायचा, आम्ही संबंध तोडले होते, अतिकवर बेछूट गोळीबार करणाऱ्या लवलेशच्या वडिलांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:54 AM2023-04-17T06:54:54+5:302023-04-17T06:56:17+5:30
Atiq Ahmed Murder: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान, अतीकचा मारेकरी लवलेश यांच्या वडिलांनी सांगितले की, लवलेश रोज नशा करायचा, आम्ही त्याच्याशी संबंध तोडले होते.
दोन महिन्यांत चौकशी
योगी सरकारने हत्येच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला आहे. २ महिन्यांत चौकशी करून अहवाल देेईल. निवृत्त न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त आयपीएस सुभाष सिंह आणि जिल्हा न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेशकुमार सोनी यांचा आयाेगात समावेश आहे.
अतीक, अशरफ यांचा साथीदार गु्ड्डू मुस्लिमचा नाशकात संवाद
नाशिक : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतीक अहमद व अशरफ यांना मदत करणाऱ्या संशयिताचा साथीदार गुड्डू मुस्लिम याचा नाशिकमध्ये एका व्यक्तीसोबत संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित वेलकम हॉटेलचा वेटर वाकर याची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. मात्र, चौकशीनंतर पोलिसांनी संशयिताला सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुन्हेगारांना देशाच्या कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. राजकीय हेतूने न्यायालयीन प्रक्रियेत छेडछाड करणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
तुर्की मेड ‘जिगाना’ पिस्तूलचा वापर
नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मागील वर्षी ५ एप्रिलला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत वापरलेल्या ‘जिगाना’ या अत्याधुनिक पिस्तुलाचा वापर उत्तर प्रदेशचा माफिया अतिक अहमद आणि अशरफच्या खुनासाठीही करण्यात आला आहे. त्यामुळे तुर्कीमध्ये तयार होणारे हे पिस्तूल नांदेडपर्यंत पाेहोचले कसे? हे शोधावे लागणार आहे.
जिगाना या अत्याधुनिक ऑटोमॅटिक पिस्तूलला भारतात बंदी आहे. अवैध तस्करीच्या माध्यमातून येथे भारतात आणले जाते. पाकिस्तानातून हे पिस्तूल भारतात पोहोचविले जाते असा संशय आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी
अतिक अहमद हत्येनंतर पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली व गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी तयार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहेत तीन मारेकरी...
त्याच्याबद्दल माहिती नाही : वडील
आरोपी लवलेशचे वडील यज्ञ तिवारी यांनी मुलासंदर्भात माहिती दिली की, ‘आमच्याकडे त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही आणि आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तो रोज नशा करायचा. आम्ही त्याला सोडून दिले आहे. जेव्हापासून त्याचे नाव अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात आले आहे, त्यामुळे माझी नोकरी गेली आहे, असे ते म्हणाले.
तो लहानपणीच घरातून पळून गेला
दुसरा आरोपी सनी सिंहचा भाऊ पिंटू सिंग म्हणाला, ‘त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. आम्ही तीन भाऊ होतो, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तो कोणताही कामधंदा करत नाही. तो १५ वर्षांपूर्वी घरातून पळून गेला होता. सनी दिवसभर फिरत राहतो. काहीही काम करत नाही. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर १८ गुन्हे दाखल असून तो फरार होता.
पोलिसाच्या हत्येत सहभागी
तिसरा आरोपी कासगंजचा रहिवासी अरुण मौर्य याच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार, तो १० ते ११ वर्षांचा होता तेव्हापासून तो घर सोडून गेला होता. त्याचे वडील हिरालाल यांचे निधन झाले आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. अरुण एका पोलिसाच्या हत्येचा आरोपी आहे.
उत्तर प्रदेशात जंगलराज असून गुन्हेगारांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) संरक्षण मिळत आहे. राज्यात कायदा आणि संविधानाचे राज्य नाही. रस्त्यावर खुलेआम हत्या होत आहेत. गुन्हेगारांना सत्ताधारी पक्षाचे अभय मिळाले आहे. - अखिलेश यादव, अध्यक्ष, सपा
भाजप उत्तर प्रदेशात कायद्याच्या आधारे सरकार चालवत नसून बंदुकीच्या जोरावर सरकार चालवत आहे. २०१७ मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून हा प्रकार सुरू आहे. तुम्ही बघा शस्त्रे कशी उडवली गेली. ही सुनियोजित हत्या आहे. - असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एआयएमआयएम
nअतिक अहमद ५ वेळा आमदार आणि खासदारही झाला होता. अतिकवर ४४ वर्षांपूर्वी पहिला खटला दाखल झाला होता.