Atiq Ahmed Murder: गाडीतून खाली उतरण्यापूर्वी अतिक अहमद थांबला; बाजूला पाहिले, मान हलवली, पण कोणाला बघून?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:03 PM2023-04-20T15:03:15+5:302023-04-20T15:11:53+5:30
Atiq Ahmed Murder: हत्येपूर्वी अतिक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलीस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे
नवी दिल्ली: कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहागंज पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्वनिकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
अतिक व अश्रफला प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. परतताना त्या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडून अतिक व अश्रफची हत्या केली. दोन्ही भावांच्या हातात बेड्या घातलेल्या होत्या. रुग्णालयातून कोठडीत नेत असताना पोलिसांनी नीट बंदोबस्त न राखल्याने हल्लेखोरांना वाव मिळाला व हत्या प्रकरण घडले, असे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने म्हटले आहे. मात्र याचदरम्यान हत्या होण्याआधी अतिकने केलेल्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हत्येपूर्वी अतिक अहमद कोल्विन हॉस्पिटलच्या गेटवर पोलीस जीपमधून खाली उतरताना क्षणभर थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. खाली उतरण्यापूर्वी आतिक थांबवा. तेवढ्यात त्याची नजर हॉस्पिटलकडे गेली. सुमारे चार सेकंद तो तिथे पाहत राहिला. यानंतर त्याने मान हलवली आणि हातवारे केले आणि मग गाडीतून खाली उतरला. यानंतर ते हॉस्पिटलच्या आवारात पोहोचताच हल्लेखोरांनी मीडियाचे कर्मचारी असल्याचे भासवत गोळीबार केला. डोके हलवण्यापासून गोळीबारापर्यंतची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ती व्यक्ती कोण होती, ज्याला पाहून अतिक अहमदने मान हलवली, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या व्हिडिओची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Moment when Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead while interacting with media.
— ANI (@ANI) April 15, 2023
(Warning: Disturbing Visuals) pic.twitter.com/xCmf0kOfcQ
दरम्यान, अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांना गोळ्या घालण्यात आल्या, तेव्हा रुग्णालयाबाहेर मीडिया कर्मचार्यांचा जमाव जमला होता. या सर्व प्रकारात तिघेही आरोपी लपून बसले आणि त्यांनी लगेच बाहेर येऊन अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला. शूटर सनी याने पोलिसांना सांगितले की, तिघेही मरायला आले नाव्हते म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले आणि गोळीबार केल्यानंतर ते खूप घाबरले होते म्हणून त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. हत्येतील तिन्ही आरोपींची पोलिसांनी ८ तास चौकशी केली. यादरम्यान त्यांच्याकडून अनेक गुपिते उघड झाली. चौकशीदरम्यान लवलेश तिवारीने स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी असल्याचे सांगितले. पोलीस रुग्णालयाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. तिघेही ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात येणार आहेत.
हत्येनंतर 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यावर विरोधकांचा आक्षेप
अतिक आणि अश्रफ या दोघांच्या हत्येनंतर आरोपींनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याबद्दल विरोधी पक्षांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही याबाबत वक्तव्य केले होते. हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, जय श्री रामचा जयघोष करून कोणालाही ठार मारणे योग्य नाही, भले तो गुन्हेगार असला तरी. आपला देश कायदा आणि सुव्यवस्थेवर चालतो, जंगलराजवर नाही, असंही ते म्हणाले.