दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:30 PM2024-09-21T17:30:44+5:302024-09-21T17:32:09+5:30
Atishi Oath Taking, Delhi CM: १७ सप्टेंबरला अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यावर आतिशी यांच्या नावाची निवड झाली होती
Atishi Oath Taking, Delhi CM: आप नेत्या आतिशी यांनी शनिवारी दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालेल्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये बहुतांश खाती सांभाळत होत्या. आतिशी यांना सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जायचे. केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून आतिशी यांना दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे तसेच घडले. आप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आणि आज दुपारी साडेचार वाजता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
माननीय आतिशी जी ने ली मुख्यमंत्री पद की शपथ🔥
— AAP (@AamAadmiParty) September 21, 2024
अब @AtishiAAP जी दिल्ली में केजरीवाल जी की काम की राजनीति को बढ़ाएंगी आगे💯 pic.twitter.com/IfN57i0nos
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. त्यांच्या आधी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. काँग्रेसच्या शीला दीक्षित १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. १५ वर्षे २५ दिवस त्या या पदावर होत्या. तर भाजपच्या फायरब्रँड नेत्या सुषमा स्वराज १९९८ मध्ये केवळ ५२ दिवसांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या.
आतिशी यांच्यासह आणखी ५ कॅबिनेट मंत्री
आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. तर गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.