दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 23:10 IST2025-02-19T23:09:03+5:302025-02-19T23:10:45+5:30
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर, दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे.

दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले!
दिल्ली मध्ये तब्बल २७ वर्षांनंतर भाजप सरकार स्थापन होत आहे. या भाजप सरकारची सूत्रे एका महिला मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहेत. गेल्या २७ वर्षांपूर्वी दिल्लीत भाजपचे सरकार असताना सुषमा स्वराज या मुख्यमंत्री होत्या. रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर, दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे.
आतिशी यांनी 'एक्स'वर म्हटले आहे, "दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल रेखा गुप्ताजी यांचे अभिनंदन. दिल्लीचे नेतृत्व एक महिला करेल, ही आनंदाची गोष्ट आहे. दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होतील, अशी मला आशा आहे. दिल्लीच्या विकासासाठी आम आदमी पक्षा आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल."
त्यांच्यानंतरही (आतिशी यांच्यानंतर) दिल्ली सरकार एक महिलाच चालवणार असल्याने आतिशी खुश अथवा आनंदी दिसून आल्या. आतिशी यांच्यापूर्वी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्या सर्व आश्वासने पूर्ण करतील, अशी आशाही व्यक्त केली. केजरीवाल म्हणाले, "रेखा गुप्ता जी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला आशा आहे की त्या दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील. दिल्लीतील लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना पाठिंबा देऊ."
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर, रोहिणी मतदारसंघाचे आमदार विजेंद्र गुप्ता यांना दिल्ली विधानसभा अध्यक्ष असतील.