'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 03:54 PM2024-04-28T15:54:38+5:302024-04-28T15:55:22+5:30
Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचार गीतावर (थीम साँग) निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. यावरून दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.
"जेव्हा भाजपा ईडी-सीबीआयचा वापर करून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकते, तेव्हा निवडणूक आयोगाचा त्यावर आक्षेप नाही, पण आमच्या गाण्यात ते लिहिल्यास निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे", असे आतिशी म्हणाल्या. आतिशी यांच्या म्हणण्यानुसार, भाजपाने हुकूमशाहीचा वापर करणे योग्य आहे, त्याबद्दल कोणताही प्रचार केला तर ते चुकीचे आहे. आपच्या संपूर्ण गाण्यामध्ये भाजपाचे नाव नाही, पण तुम्ही हुकूमशाही शब्द वापरत असाल तर तुम्ही सरकारला लक्ष्य करत आहात, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
ज्या पद्धतीने काँग्रेसचे बँक खाते सील करण्यात आले आणि आता आपच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली, त्याचा अर्थ देशात लोकशाही धोक्यात आली आहे, असे आतिशी म्हणाल्या. तसेच, 2024 ची निवडणूक ही लोकशाहीची हत्या झालेली निवडणूक म्हणून लोकांना आठवेल असे होऊ नये. ईडी आणि सीबीआयचे राजकारण उघडकीस येऊ नये, अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे का? असा सवालही आतिशी यांनी केला.
सत्य हे आहे की हुकूमशाही सरकारमध्ये विरोधी पक्षांना प्रचार करण्यापासून रोखले जाते. आज हेच घडले आहे. भाजपाचे आणखी एक शस्त्र, निवडणूक आयोगाने या पत्राद्वारे आपच्या प्रचार गीतावर बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे.