आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 06:59 PM2024-09-21T18:59:29+5:302024-09-21T19:01:24+5:30

Delhi CM Atishi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

Atishi take oath path as Delhi CM not easy know challenges | आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

Delhi CM Atishi : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शनिवारी राजभवनात आयोजित कार्यक्रमात अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह ५ मंत्र्यांनीही शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा दिल्यानंतर  विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. 

आतिशी या आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडे दिल्लीची मोठी जबाबदारी दिली आहे. पण, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आतिशी यांचा सरकार चालवण्याचा पुढील मार्ग सोपा नसणार आहे. कारण, आम आदमी पक्षावर आधीच अनेक गंभीर आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत आतिशी या दिल्लीचे सरकार कसे चालवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधकांचा हल्लाबोल होणार 
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राजीनाम्याची घोषणा केल्यापासून भाजपसह संपूर्ण विरोधक सातत्याने आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहेत. आम आदमी पक्षाच्या सरकारवर गलथान कारभाराचा आरोप भाजप करत आहे. अशा स्थितीत आतिशी यांनी सरकारच्या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यांना कमी वेळेत जास्त काम करावे लागेल. तसेच, भाजपसोबतच काँग्रेस सुद्धा आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, जशा निवडणुका जवळ येतील, तसं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत आतिशी यांना आपल्या कामाच्या जोरावर विरोधकांना उत्तर द्यावं लागणार आहे.

पक्षाची प्रतिमा सुधारणं, मोठं आव्हान असणार
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण प्रकरणात जामिनावर आहेत. याशिवाय, अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर पक्षाचे नेते मनीष सिसोदियाही बाहेर आले आहेत. अशा स्थितीत आम आदमी पक्षाची प्रतिमा सुधारणे, हे मुख्यमंत्री अतिशी यांच्यासाठी मोठं काम असणार आहे. सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासोबतच आतिशी यांना जनतेत जाऊन पक्षाची बाजू मांडावी लागणार आहे.

आश्वासनांची पूर्तता करावी लागणार
याचबरोबर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ करणे, मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना १,००० रुपये मानधन देणे, सेवा घरापर्यंत पोहोचवण्याची योजना, दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण २.० आणि सौर धोरण लागू करणे, अशी अनेक आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी दिली आहेत. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी आतिशी यांना या योजना आणि आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

Web Title: Atishi take oath path as Delhi CM not easy know challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.