आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:59 PM2024-09-18T16:59:10+5:302024-09-18T17:08:12+5:30

Atishi to be Delhi’s new CM : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.

Atishi to take oath as Delhi CM on September 21, LG proposes date to President | आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

Atishi to be Delhi’s new CM : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना २१ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारी आतिशी यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यानंतर उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. 

केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, दोन नवीन आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यातील एक दलित समाजातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी केजरीवाल मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गेहलोत आणि सौरभ भारद्वाज पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार. हे जवळपास निश्चित झाले आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री केले जाऊ शकतात.

आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी आतिशी यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबत नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेतली. काल आम आदमी पक्षाच्या आमदारांची केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यात आतिशी यांची सभागृह नेतेपदी निवड केली. पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

आतिशी कोण आहेत? 
- आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील आहेत. त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे आई वडील प्रोफेसर होते. दिल्लीतील कलकाजी हा आतिशी यांचा विधानसभा मतदारसंघ असून त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या. सिसोदिया यांना तेव्हा अटक झाली होती. 
- आतिशी यांनी २००१ साली दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहास विषय घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले. मग ऑक्सफर्ड विद्यापीठातून तिने २००३ साली इतिहासात मास्टर्स पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विजय सिंग तोमर आणि त्रिप्ता वाही यांचे आतिशी हे कन्यारत्न. जून १९८१ मध्ये तिचा जन्म झाला.
- २०१३ साली आतिशी यांनी आम आदमी पक्षासाठी काम सुरू केले होते. २०१९ साली भाजपचे गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. पण त्यांनी काम सुरूच ठेवले व २०२० साली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. 
- त्यावेळी भाजपच्या धरमबीर सिंग यांचा त्यांनी पराभव केला. आपमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सतत त्यांना प्रोत्साहन दिले. केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. आतिशी यांनी यापूर्वी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतलेला आहे.
 

Web Title: Atishi to take oath as Delhi CM on September 21, LG proposes date to President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.