आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:28 AM2024-09-19T05:28:37+5:302024-09-19T05:29:06+5:30
आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली :दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आप नेत्या आतिशी मार्लेना शनिवारी शपथ घेण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार
दिल्लीचे मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक आठवड्यात सरकारी निवासस्थान सोडणार असल्याची माहिती आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणून मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा परत करणार असून लोकांमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून ते यापुढे वावरतील.
सोयीसुविधांसोबतच सरकारी सुरक्षादेखील ते सोडणार आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबासाठी योग्य निवासस्थानाचा शोध घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.