कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:05 PM2024-09-19T15:05:27+5:302024-09-19T15:05:56+5:30
Atishi’s Delhi Cabinet : मंत्रिमंडळात अतिशी यांच्यासह ५ जुने मंत्री कायम राहणार असून सध्या १ मंत्रिपद रिक्त राहणार आहे.
Atishi’s Delhi Cabinet : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, आतिशी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत नव्या नावाचा समावेश होणार आहे. सुलतानपूर माजराचे आमदार मुकेश अहलावत एससी-एसटी कोट्यातून दिल्ली सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. तर मंत्रिमंडळात अतिशी यांच्यासह ५ जुने मंत्री कायम राहणार असून सध्या १ मंत्रिपद रिक्त राहणार आहे. आतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, गोपाल राय, इम्रान हुसेन, मुकेश अहलावत यांच्या नावांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असून एक मंत्रीपद अजूनही रिक्त राहणार आहे.
कोण आहेत मुकेश अहलावत?
मुकेश अहलावत हे सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुकेश अहलावत यांनी भाजपचे उमेदवार राम चंदर छावरिया यांचा पराभव केला होता. मुकेश अहलावत यांनी भाजप उमेदवाराचा ४८,०५२ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मुकेश अहलावत यांना ७४, ५७३ मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार राम चंदर छावरिया यांना २६,५२१ मते मिळाली होती. दरम्यान, मुकेश अहलावत यांना आता दिल्ली सरकारमध्ये एससी-एसटी कोट्याअंतर्गत मंत्री करण्यात येणार आहे. मात्र, चार मंत्री तेच राहणार असून, मंत्रिमंडळातील एक जागा अद्याप रिक्त आहे.
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना २१ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत.