हिमाचलमध्ये अटीतटीची लढाई, ऑपरेशन लोटसची तयारी, भाजपाने विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:55 AM2022-12-08T10:55:41+5:302022-12-08T11:06:42+5:30
Himachal Pradesh Assembly Elections 2022 Result: हिमाचल प्रदेशमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वान येण्याची शक्यता निर्माण झाली असून, सत्ता मिळवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. आघाडी पिछाडीचे पारडे कधी भाजपाकडे तर कधी काँग्रेसच्या दिशेने झुकत आहेत. अशा परिस्थितीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वान येण्याची शक्यता निर्माण झाली असून, सत्ता मिळवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने पुढील मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आघाडी पिछाडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. आताच्या आकडेवारीनुसार हिमाचलमध्ये काँग्रेस ३३ तर भाजपा ३० जागांवर आघाडीवर आहे. तर ५ जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येऊन, अपक्षांचं महत्त्व वाढण्याची शक्यता आहे.
हिमाचलमधील मतदानाचा कल विचारात घेऊन भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच पुढील रणनीती आखून समीकरणे जुळवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच घटनाक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपाने ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना हिमाचल प्रदेशमध्ये पाठवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ४४ जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. भाजपामधील सुमारे २२ नेत्यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. त्यापैकी काही उमेदवार आता मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे त्रिशंकू निकाल लागल्यास हे अपक्ष उमेदवार जिंकून आल्यानंतर कुणाला पाठिंबा देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.