एटीएममधून पैसे चोरल्याचा तक्रारींंसाठीही लागताहेत रांगा....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:30 PM2018-09-10T12:30:51+5:302018-09-10T12:35:05+5:30
पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागतात हे पाहिले असेलच, पण एटीएममद्वारे पैसे चोरल्याच्या तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्येही रांगा लागत आहेत. होय, सध्या नवी दिल्लीकर या फसवणुकीमुळे भलतेच त्रस्त झाले आहेत.
नवी दिल्ली : पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागतात हे पाहिले असेलच, पण एटीएममद्वारे पैसे चोरल्याच्या तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्येही रांगा लागत आहेत. होय, सध्या नवी दिल्लीकर या फसवणुकीमुळे भलतेच त्रस्त झाले आहेत. रविवारी दिल्लीतील शकरपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी चक्क रांग लावावी लागली आहे.
नवी दिल्लीमध्ये या महिन्याभरामध्ये एटीएमचा वापर करून ठगांनी पैसे काढल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडली आहेत. या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी नागिरकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली आहे. काही पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला असून नागरिकांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्लाही दिला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
एका विद्यार्थ्याच्या खात्यातून रविवारी सकाळी 5 हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे दुसऱ्या भागातील देना बँकेच्या एटीएममधून काढण्यात आले. तो नजीकच्या शकरपूर पोलीस ठाण्यात पोहोचला तर त्याला मंडावली पोलिसांत जाण्य़ास सांगण्यात आले. तेथील पोलीस ठाण्यातूनही त्या विद्यार्थ्याला तक्रार न घेता माघारी पाठविण्यात आले. तसेच एका महिलेच्या खात्यातून 50-50 हजार असे दोनवेळा पैसे काढण्यात आले आहेत. तिने तक्रार नोंदवूनही तिला तिचे पैसे परत मिळालेले नाहीत.
केंद्रातील मोदी सरकार जरी डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्य़ाचा प्रयत्न करत असले तरी लोकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यातून गायब होत आहेत. यामुळे खरेच डिजिटल अर्थव्यवस्था सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होत आहे.