एटीएम बंद, बँकांतही सुटे नाहीत
By admin | Published: November 17, 2016 02:24 AM2016-11-17T02:24:01+5:302016-11-17T02:24:01+5:30
बँकांतून १00 रुपयांच्या पाच नोटांचा एकूण साडेचार हजार रुपये बदलून मिळतील, बँकेतून एकावेळी २४ हजार रुपये काढता येतील, एटीएममध्ये
मुंबई : बँकांतून १00 रुपयांच्या पाच नोटांचा एकूण साडेचार हजार रुपये बदलून मिळतील, बँकेतून एकावेळी २४ हजार रुपये काढता येतील, एटीएममध्ये बदल करणे सुरू असून, अनेक एटीएम सुरूही झाले आहेत, पैसे बदलुन घेणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल, अशा अनेक गोष्टी केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत असल्या तरी बहुसंख्य भागात प्रत्यक्षात यापैकी काहीच होत नसल्याचे बुधवारी आढळून आले.
त्यामुळे बँकांच्या पुढे प्रचंड रांगा कायम होत्या. एटीएम सुरू झाली का, हे पाहायला येणारे खातेदार ती बंद असल्याने निराश व नाराज होत होते. पैसे बदलून घेणाऱ्यांच्या संख्येत कमी झाल्याचे कुठेच आढळून आले नाही. गर्दी कायम असल्याने लोकांच्या हातात आजही पुरेशी रोकड नाही, हे उघड झाले आहे.
अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या नोटाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळ चार हजार रुपयेच बदलून दिले जात आहेत. देशभरातील ८0 टक्के एटीएम अद्याप बंद आहेत वा त्यांचे सर्व्हर बंद आहेत. ज्यांचे सर्व्हर सुरू आहेत, त्यात १00 रुपयांच्या नोटाच नाहीत. शिवाय एटीएममधून दोन हजार रुपये येण्यासाठी जे बदल करणे गरजेचे आहेत, ते झालेलेच नाहीत.
खातेदाराला एका आठवड्यात २४ हजार ५00 रुपये काढता येतील, अशीही घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात गुरुवारी वा शुक्रवारी बँकेतून १0 हजार रुपये काढलेल्या ग्राहकांना आता तुम्हाला केवळ १४ हजार रुपये काढता येतील, कारण याच आठवड्यात १0 हजार रुपये काढले आहेत, असे सांगण्यात येत होते. आठवडा म्हणजे कॅलेंडर आठवडा नव्हे, तर एकदा रक्कम काढून सात दिवस पूर्ण झाल्यानंतरच खातेदारांना दुसऱ्यांदा रक्कम काढता येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)