पुलवामाचा बदला घेत बालाकोटमध्ये केला हल्ला; विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:07 AM2021-02-27T01:07:21+5:302021-02-27T06:55:25+5:30
दोन वर्षे पूर्ण : विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम
नवी दिल्ली : काश्मिरात पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हल्ला करून याचा बदला घेतला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली.
पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण ठिकाणावर भारताने हल्ला केला होता. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मारण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक करत स्पष्ट केले होते की, हा हवाई हल्ला म्हणजे भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना इशारा आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसविले होते. पुलवामातील या घटनेत ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एलओसीवरून पाकिस्तानच्या बाजूने हवाई हल्ले केले.
या हल्ल्यात ३५० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सांगण्यात येते. मृतात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर हाही होता.
भारतीय हवाई दलाचे जोरदार प्रत्युत्तर
या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत जेट पाठविले. त्याला भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि हे विमाने परतवून लावले. या घटनाक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जेट पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. ६० तासांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली. २८ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांची सुटका झाली. अभिनंदन यांना ऑगस्ट २०१९ मध्ये वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.