भाजप कार्यालयावर बिहारमध्ये हल्ला
By admin | Published: May 18, 2017 04:19 AM2017-05-18T04:19:01+5:302017-05-18T04:19:01+5:30
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरासह इतर ठिकाणी प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्यानंतर राजद आणि भाजपमधील संघर्ष आता रस्त्यावर आला आहे.
पाटणा : राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या घरासह इतर ठिकाणी प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्यानंतर राजद आणि भाजपमधील संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. राजदच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या पाटण्यातील प्रदेश कार्यालयावर बुधवारी हल्ला केला.
लालूंवर प्राप्तीकराच्या धाडींमुळे नाराज राजद कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आज अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी त्यांची भाजप कार्यकर्त्यांशी चकमक उडाली. दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. यात भाजपचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. राजद कार्यकर्त्यांनी परिसरातील अनेक वाहनांचीही तोडफोड केली. त्यांनी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० ते १०० राजद कार्यकर्ते भाजप कार्यालयावर चालून गेले. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या आणि दगड होते. त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. यात भाजप कार्यालयात कार्यरत दोन जण जखमी झाले. हल्ला करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, ओळख पटताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, भाजप कार्यालयातील नेत्यांनी पोलिसांनी राजद कार्यकर्त्यांना मदत केल्याचा आरोप केला. राजदच्या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. राजद कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले.
भाजपचे कार्यकर्ते कार्यालयात काम करीत असताना राजदच्या गुंडांनी हल्ला केला, असे भाजप नेते अरविंद कुमार यांनी सांगितले. या घटनेने बिहारमधील राजकारण पुन्हा तापले आहे. राजदने ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हटले, तर भाजपने सरकार आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. ही घटना लाजिरवाणी आणि बिहारच्या राजकारणासाठी काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केली.