दिल्लीवर हल्ल्याचे सावट
By admin | Published: December 6, 2015 03:38 AM2015-12-06T03:38:40+5:302015-12-06T03:38:40+5:30
काही प्रतिष्ठित नामवंतांना लक्ष्य बनवून राजधानी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने आखल्याची खात्री पटल्यानंतर या कटाच्या
नवी दिल्ली : काही प्रतिष्ठित नामवंतांना लक्ष्य बनवून राजधानी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने आखल्याची खात्री पटल्यानंतर या कटाच्या पूर्ततेसाठी राजधानीत घुसलेल्या दोन दहशतवाद्यांचा दिल्ली पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष
शाखेला लष्करचे दोन संशयित सदस्य दुजाना आणि उकाशा यांच्याबद्दल गोपनीय सूचना प्राप्त झाल्यानंतर, हा कट उघडकीस आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला. या दोघांनी पाकव्याप्त काश्मिरातून जम्मू-काश्मिरात घुसखोरी केली व आता ते दिल्लीत शिरल्याची माहिती आहे.
यासंदर्भात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष शाखेला लष्कर-ए-तय्यबाविषयी सहानुभूती असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा करणे, पाळत वाढविणे आणि धोक्याचा त्वरित अंदाज घेण्याच्या दृष्टीने सर्वोपरी उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, लष्कर ए तय्यबा दिल्ली आणि देशाच्या अन्य भागात हल्ल्याचा कट रचत असून, तो अंमलात आणण्याकरिता संघटनेच्या म्होरक्यांनी जम्मू-काश्मीरसह इतर आंतरराष्ट्रीय सीमांवरून भारतात घुसखोरी केली असल्याचे या तक्रारीत नमूद आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
आयएसआयचा चौथा हेर ताब्यात
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करीत असल्याच्या आरोपात दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका शाळेच्या साबर नावाच्या शिक्षकास अटक केली. आयएसआयचा संशयित संचालक कफईतुल्ला खान याच्या नेतृत्वातील हेरगिरीप्रकरणाची ही चौथी अटक आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेवर सैनिकांच्या तैनातीबद्दल महत्त्वाची माहिती साबर गोळा करीत होता.
ग्रेनेडहल्ला शक्य
दुजाना आणि उकाशा हे दोघे लष्करचे सदस्य प्रदीर्घ काळ काश्मीर खोऱ्यात राहिले आहेत व दिल्लीत नामवंत लोकांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती अथवा ग्रेनेडहल्ला करण्याची त्यांची योजना आहे. या हल्ल्यात ते स्वत:चा वा लष्करच्या अन्य सदस्याचा वापर करू शकतात.
कट्टरवाद्यांवर अंकुश हवा-मेहबुबा मुफ्ती
हिंदुत्वाच्या नावावर सक्रिय कट्टरवादी तत्त्वांवर अंकुश घालण्यात येईल, अशी अपेक्षा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. मेहबुबा यांनी या कट्टरवाद्यांची तुलना इस्लामचा गैरवापर करणाऱ्या इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अॅण्ड सीरिया या दहशतवादी संघटनेशी केली.
गुवाहाटीत २ बॉम्बस्फोट, ४ जखमी
गुवाहाटी : शहरातील गजबजलेल्या फॅन्सी बाजार भागात शनिवारी २ बॉम्बस्फोट होऊन चार जण जखमी झाले. जखमींमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. हे स्फोट आयईडी किंवा हातबॉम्बचे नव्हते तर ते फटाक्याचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.