दिल्ली मुख्य सचिव अंशु प्रकाश मारहाण प्रकरणी आप आमदार प्रकाश जरवाल अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 09:09 AM2018-02-21T09:09:12+5:302018-02-21T09:10:33+5:30
आपचे आमदार प्रकाश जरवाल यांना अटक करण्यात आली.
नवी दिल्ली- दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी आम आदमी पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आली आहे. आपचे आमदार प्रकाश जरवाल यांना अटक करण्यात आली. मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत मंगळवारी रात्री प्रकाश जरवाल यांना अटक केली. प्रकाश जरवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या ओखला या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दुसरं नाव अमानतुल्ला यांचं आहे व ते मुख्य आरोपी आहेत, असा दावा केला जातो आहे. प्रकाश जरवाल यांच्या विरोधात आयपीसी कलम 186, 353, 323, 342, 504, 506 (2) आणि 120 बी व 34 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरवाल त्यांच्या सहकाऱ्यांसह एका लग्नासाठी जात होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी रात्री 11 वाजता खानपूर ट्रॅफिक सिग्नलजवळ त्यांची गाडी थांबविली. त्यावेळी जरवाल यांना अटक करण्यात आली. जरवाल यांच्या सहकाऱ्यांनी आप नेतृत्त्वाला या संदर्भातील माहिती दिली.
दरम्यान, आपचे काऊंन्सिलर पी चौहान यांनी जरवाल यांच्या अटकेनंतर पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, आमदार जरवाल दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यांनी सगळी माहितीही तेथे दिली मग त्यांना रात्री अटक करण्याची काय गरज होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हीही मुख्य सचिवांविरोधात तक्रार दाखल केली पण त्यांना अटक केलं नाही. आम्ही सरेंडर करायला तयार होतो. पोलिस वाट पाहू शकले असते.
He (Prakash Jarwal) went to police station in noon & discussed things in detail. What was the need of detaining him in a hurry in night? We also lodged complaint against chief secy but he wasn't arrested. We were ready to surrender, they could've waited: P Chauhan, AAP Councillor pic.twitter.com/MpRn3lvYe5
— ANI (@ANI) February 20, 2018
नेमकं प्रकरण काय?
केजरीवालांच्या निवासस्थानी आपल्याला आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी केला. सोमवारी रात्री आपण बैठकीसाठी केजरीवालांच्या निवासस्थानी गेलो असताना ही घटना घडल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. हा सर्व प्रकार केजरीवालांसमोर घडला.
मुख्य सचिवांनी या प्रकरणी दिल्लीच्या नायाब राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने मुख्य सचिवांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. केजरीवालांच्या निवासस्थानी असे काहीही घडले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.